नगर तालुका : अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यांचा मानवी क्षेत्रातील वाढता वावर, तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या होणाऱ्या शिकारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. तालुक्यात मानव बिबट संघर्षात होत असलेली वाढ पाहता वन विभागातर्फे युद्ध पातळीवर बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गावोगावी जनजागृती, शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिर, तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसविण्यात आले आहेत. ड्रोनच्या साह्याने बिबट्यांचा शोध घेतला जात आहे. वन विभागाला विविध गावांमधून तरुण, ग्रामस्थांचे सहकार्य मिळताना पहावयास मिळते. जेऊर येथे तर शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने वन विभागाने पिंजरा बसविला आहे. विद्यार्थ्यांकडून होत असलेली जनजागृती, तसेच प्रत्यक्ष कृतीत सहभाग चर्चेचा विषय ठरत आहे.
नगर तालुक्यात वन विभागाचे असलेले साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र, तसेच आर्मीचे बाराशे हेक्टर क्षेत्र याचबरोबर खासगी डोंगररांगांमुळे परिसरात विविध वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. गर्भगिरीच्या चोहीकडे विखुरलेल्या डोंगररांगा वन्यप्राण्यांसाठी नंदनवन ठरत आहेत. हरीण, काळवीट, ससा, खोकड, उदमांजर, रानमांजर, रानटी कुत्रे, लांडगा, कोल्हा, तरस, साळींदर, रानडुक्कर, मोर याचबरोबर विविध पक्ष्यांचा मोठा वावर जंगल क्षेत्रात आढळून येतो.
गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर गावोगावी आढळून येत आहे. बिबट्यांकडून खारे कर्जुने परिसरातील चिमुकलीचा बळी, तर आठ वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला झाला होता. दररोज शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. यामुळे तालुका बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे. तालुक्यातील बहुतांशी गावात बिबट्याचे दर्शन झालेलेच आहे. शहराच्या वेशीपर्यंत बिबट्याने दस्तक दिलेली आहे. मानव वस्तीत बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने शेतकरी, लहान मुले, तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे. तालुक्यात वन विभागाचे तीन मंडळ कार्यरत आहेत. नगर, जेऊर, गुंडेगाव या तीनही मंडलांमध्ये गावोगावी जनजागृती, शाळा व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिर, तसेच बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात पिंजरे बसविण्यात आलेले आहेत.
जेऊर परिसरात श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वनरक्षक मनेष जाधव, महाराष्ट्र राज्य वन्यजीव संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी तोडमल वस्ती परिसरात पिंजरा बसविला.
बिबट प्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळेस एकटे बाहेर जाण्याचे टाळावे. लहान मुलांना एकटे सोडू नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात बांधावे. मोबाईल टॉर्च, प्रकाश योजना सोबत असावी. घाबरून पळू नये. जाड काठी, शिट्टी, टॉर्च जवळ बाळगावी. बिबट्याच्या हालचालीचे पुरावे दिसल्यास वन विभागास कळवावे. शेतातील उंच गवत, झुडपे, नाले यांच्या आसपास जागरूक राहावे. सर्व नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी.अजिंक्य भांबुरकर, संस्थापक, राज्य वन्यजीव
तालुक्यात बिबट्यांचा वावर विविध ठिकाणी आढळून आलेला आहे. वन विभागातर्फे बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवन संरक्षक अश्विनी दिघे, वनपरिमंडल अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. त्यांना गावोगावी ग्रामस्थ, तरुणांचे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे देखील सहकार्य लाभत आहे.मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग