नगर: महापालिका हद्दीत मालमत्ता खरेदी केल्यानंतर महसूल दरबारी नोंद झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या एकूण खरेदी रकमेच्या 1 टक्का शुल्क भरून महापालिकेत नोंदणी करावी लागते. 2025-2026 या आर्थिक वर्षात शहरातील 3 हजार 420 मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या मालमत्ता नोंदणी विभागाकडे शुल्क भरून मालमत्ता नोंदणी केली असून या माध्यमातून महापालिकेला 5 कोटी 26 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
शहरात दर वर्षी मालमत्तांची मोठ्या प्रमाणात खरेदी-नोंदणी होते. काही मालमत्ताधारक मात्र, मालमत्ता खरेदी केल्यानंतर महापलिकेकडे नोंदणी करीत नाहीत. त्यामुळे जुन्याच्या मालकाच्या नावाने घरपट्टी, पाणीपट्टीची बिले कार्यन्वित होतात.
मालमत्ता नोंदणी न केल्यास पुढे कायदेशीर बाबीही उद्भवू शकतात. त्यामुळे नव्याने मालमत्ता खरेदी, वारस नोंदणी, बक्षीसपत्र, मृत्युपत्र आदींची महापालिकेच्या मालमत्ता विभाकडे नोंदणी आवश्यक आहे. याची नागरिकांनी दखल घ्यावी, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
महापालिकेच्या जुने कार्यालयात मालमत्ता नोंदणी विभाग असून करमूल्य निर्धारण विभागाच्या अतंर्गत हा कक्ष येतो. तिथे मालमत्ता नोंदणी हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाते. मालमत्ता नोंदणीसंदर्भात काही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, करमूल्य निर्धारण अधिकारी विनायक जोशी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
महसूल गळतीला आळा बसणार
मालमत्ता खरेदीनंतर महापालिकेतील नोंदणी प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. महापालिका प्रशासन दुय्यम निबंधक कार्यालयाशी सॉफ्टवेअर एकत्रीकरण करून ही यंत्रणा कार्यान्वित करणार असून, मालमत्ता खरेदीची नोंद होताच त्याची माहिती थेट महापालिकेच्या मालमत्ता नोंदणी विभागाकडे पोहोचणार आहे.
त्यामुळे शहरात झालेल्या मालमत्ता खरेदी-विक्री व हस्तांतरणाची अद्ययावत माहिती महापालिकेकडे उपलब्ध राहणार आहे. तसेच, खरेदीनंतर नोंदणीस विलंब करणाऱ्या मालमत्ता धारकांना नोटीस बजावून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास भाग पाडले जाणार असल्याने महसूल गळतीलाही आळा बसणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.