Mula Dam Water Level Pudhari
अहिल्यानगर

Mula Dam Water Level: संततधारेचा ‘मुळा’ला ३.६ टीएमसीचा बुस्टर

शेतकरी, नागरिक आणि जलयोजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: जून महिनाभर कोरड्या पडलेल्या आभाळामुळे दुष्काळाच्या छायेत गेलेल्या मुळा धरणाने अखेर नवजीवनाचा श्वास घेतला आहे. अवघ्या तीन दिवसांच्या संततधार पावसाने धरणाला तब्बल ३.६ टीएमसी (सुमारे ३ हजार ६०० दशलक्ष घनफूट) नव्या पाण्याची भर घालत पाणीसाठा १० हजार दशलक्ष घनफुटांच्या टप्प्यावर पोहोचविला आहे.

काही दिवसांपूर्वी केवळ आठ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यावर आलेले धरण आता पुन्हा भरारी घेऊ लागल्याने दक्षिण नगर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि जलयोजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुळा धरणातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटला होता. खरीप हंगाम धोक्यात आला होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पेरण्या रखडल्या होत्या, तर पिण्याच्या पाण्याचे नियोजनही चिंतेचा विषय बनले होते.

मात्र हरिश्चंद्रगड, कोतूळ, आंबीत, पाचणे, खडकी, विहीर, सावरचोळ, चास, डोळासणे आदी पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती पालटली. धरणाकडे विक्रमी वेगाने पाण्याची आवक होत राहिली आणि अवघ्या तीन दिवसांत सुमारे ३.६ टीएमसी नव्या पाण्याची भर पडली.

सध्या धरणातील पाणीसाठा १० हजार दशलक्ष घनफुटांच्या पुढे गेला असला तरी मुळा धरणाची एकूण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणे आवश्यक आहे. बुधवारी सायंकाळपासून पावसाने काहीसा विराम घेतल्याने धरणाकडे होणारी आवक मंदावली असली, तरी धरणाने दुष्काळी धोक्याची पातळी निश्चितच मागे टाकली आहे.

मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील आणि शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणातील पाणीसाठा, आवक आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक नियोजन केले जात असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

८५ हजार हेक्टर शेतीचे भवितव्य

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर सुमारे ७० हजार ६८९ हेक्टर, तर डाव्या कालव्यावर १० हजार १२१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. वांबोरी पाईपचारी, भागडा चारी आणि इतर सिंचन योजनांसह एकूण सुमारे ८५ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT