‘मुळा’चा साठा 25.5 टीएमसीवर स्थिर; पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरूच Pudhari
अहिल्यानगर

Mula dam storage: ‘मुळा’चा साठा 25.5 टीएमसीवर स्थिर; पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरूच

पाणी जायकवाडीच्या दिशेने

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मुळा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली होती. परिणामी, धरणातून विसर्गात सातत्य राखत 5 हजार क्युसेक प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या धरणाचा साठा 25 हजार 500 दशलक्ष घनफुटांवर स्थिर राखण्यात आला आहे. धरणात येणारे नवे पाणी तसेच जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे.

मुळा धरणातून जायकवाडी धरणाला 2249 दलघफू इतके पाणी आतापर्यंत सोडले गेले आहे. अजूनही विसर्ग सुरूच आहे. मुळा धरण जवळपास 25 हजार 500 म्हणजेच 98 टक्के भरलेले आहे. काल सायंकाळी 6 वाजता 4 हजार 227 क्युसेक प्रवाहाने नवीन पाणी जमा होत होते. पाणलोट क्षेत्र असलेले पांजरे, खडकी, सावरचोळ, शिळवंडी, चास, आंबित, कुमशेत, हरिश्चंद्रगड या परिसरात सलग रिमझिम पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात आवक होत आहे. (Latest Ahilyanagar News)

धरणातील वाढलेली जलआवक लक्षात घेता, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी सांगितले, की नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, नदीपात्रात अनावश्यक हालचाल करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. धरणाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, विसर्ग नियोजित व सुरक्षित पद्धतीने सुरू आहे. हवामानाची परिस्थिती आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी जास्त केला जात आहे.

नागरिकांसाठी सूचना

  • नदीकाठच्या गावांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन.

  • नदीपात्रात जाणे टाळावे.

  • शेतीची उपकरणे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

  • प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT