नगर: राज्यात सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली असून, 30 ऑगस्ट या शेवटच्या दिवसांपर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 23 हजार 118 शेतकर्यांनी सहभाग घेतला आहे. या शेतकर्यांनी 4 लाख 41 हजार 935 अर्जांव्दारे 2 लाख 35 हजार 848 हेक्टरवरील खरीप पिकांचा विमा उतरविला आहे.
गेल्या वर्षी फक्त एक रुपयात शेतकर्यांना अर्ज दाखल करता येत होते. त्यामुळे 11 लाख अर्ज दाखल झाले होते. यंदा दीडशे ते अठराशे रुपये भरण्याची वेळ आल्यामुळे यंदा अर्जांची संख्या कमी झाली. (Latest Ahilyanagar News)
नैसर्गिक आपत्ती, कीड, आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण मिळावे तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितही शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम 2025-26 या वर्षासाठी लागू करण्यात आली.
गेल्या दोन वर्षात प्रति अर्ज एक रुपया भरुन राबविण्यात आली होती. आता पीकनिहाय हेक्टरी विमा हप्ता रक्कम निश्चित करण्यात आला. पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. खरीप हंगामातील भात, बाजरी, मुग, उडीद, तूर, मका, कापूस, सोयाबीन, कांदा, भुईमूग, आदीसह दहा पिकांसाठी ही योजना लागू आहे.
प्रारंभी शेतकर्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतु पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन 14 जुलै रोजी जाहीर झाले. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांना 31 जुलैपर्यंत सहभागी होता आले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने बिगर कर्जदारांसाठी 14 जुलै तर कर्जदारासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.
जिल्ह्यात खरीप पेरणी 7 लाख 23 हजार 628 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी 30 ऑगस्टपर्यंत 25 कोटी 12 लाख 83 हजार 212 रुपयांचा विमा हप्ता भरत शेतकर्यांनी 2 लाख 35 हजार 849 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा उतरविला आहे.
पीकविम्यासाठी अर्ज कंसात हेक्टर
अहिल्यानगर : 20,267 (12352), अकोले : 33,626 (16928), जामखेड : 51,490(26008), कर्जत : 23,197 (11545), कोपरगाव : 19,792 (13771), नेवासा : 45,001 (29726), पारनेर : 49,691 (22682), पाथर्डी : 59,818 (23264), राहाता : 21,962 (15299), राहुरी : 23,037 (13047), संगमनेर : 27,499 (13066), शेवगाव : 38,857 (21462), श्रीगोंदा : 13,246 (6498), श्रीरामपूर : 14,452 (10199).