पाथर्डी: अतिवृष्टीमुळे पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून भरीव आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
आमदार राजळे परगावी परिषदेसाठी गेल्या असल्या, तरी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांना मदतकार्य, निवारा व अन्नसाहाय्य मिळावे यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
आमदार राजळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अडचणीच्या प्रसंगी महसूल, पोलिस, प्रशासन किंवा आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. असे सकाळपासूनच आवाहन केले होते.
पाथर्डी व शेवगांव तालुक्यांत झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले वाहू लागल्या आहेत. अनेक तलाव व बंधारे फुटून गावांमध्ये, वाड्यांमध्ये व वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे, शेतीचे, शेतमालाचे नुकसान झाले आहे.
पाथर्डी शहर, शिरसाटवाडी, माणिकदौडी, घुमटवाडी, धनगरवाडी, पिरेवाडी, जकसोन तांडा, मढी, निवडुंगे, तिसगांव, घाटशिरस, सातवड, करंजी, जवखेडे खालसा, जवखेडे दुमाला, कासार पिंपळगांव, हनुमान टाकळी, डांगेवाडी, साकेगांव, सुसरे, पागोरी पिंपळगांव, चिंचपूर इजदे, चिंचपूर पांगूळ, मानेवाडी, पिंपळगांव टप्पा, कुत्तरवाडी आदी गावांमध्येही नद्यांना महापूर आला असून, बंधारे फुटले आहेत.
अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल, पोलिस व स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जनावरांची जीवितहानी झाली असून शेती पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे.