कोपरगाव : गरबा सुरू असलेल्या ठिकाणी चारचाकी वाहन घातल्याने त्यावरून झालेल्या गोंधळाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यात दोन पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील 63 जणांविरोधात गुन्हे दाखल करत 16 जणांना अटक केली. आरोपीत लोकप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यक, माजी नगरसेवक आणि मनसे शहर प्रमुखाचाही समावेश आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोपरगावच्या मोहिनीराजनगरात बुधवारी मध्यरात्री हा राडा झाला. (Latest Ahilyanagar News)
मोहिनीराजनगर भागातील नवरात्र उत्सव मंडळाचा बुधवारी रात्री गरबा सुरू होता. त्या वेळी तेथे चारचाकी वाहन गेले. चारचाकीला रस्ता दिला नाही, तसेच वाहनाचा धक्का लागला या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने आले. दगड, विटांचा तुफान मारा करतानाच लोखंडी रॉड, दांडक्यांनी हाणामारी सुरू झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. दोन गटांत हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र जमाव मोठा आणि पोलिस कुमक अपुरी असल्याने जमावाने पोलिसांनाही टार्गेट केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी बोलावण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवले.
जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस कॉन्स्टेबल सुंबे आणि कॉन्स्टेबल भांगरे जखमी झाले. भांगरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी दिली. बुधवारी रात्रीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरात बंदोबस्तही वाढविला आहे.
नवरात्रौत्सव मंडळांना परवानगी देताना घातलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. यापुढे नियमांची पायमल्ली करणे, रस्त्यावर उत्सव साजरे करणे, त्यातून उद्भवणारे वाद यावर आता नियंत्रण आणू.अमोल भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी
1 तारखेपर्यंत पोलिस कोठडी
आरोपीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी आणि मनसेच्या शहरप्रमुख सतीश काकडे यांचाही समावेश आहे. परस्परविरोधी फिर्यादी दाखल होताच पोलिसांनी दोन्ही गटांतील 16 जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.