जामखेड : तालुक्यातील खर्डा मोहरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुखदेव श्रीरामे यांचा बैल ठार झाला असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. खर्डा परिसर डोंगराच्या कुशीत असलेल्या मोहरी, खर्डा परिसरात बिबट्यांची हालचाल गेल्या काही दिवसांत वाढत असून, ग्रामस्थांनी या भागाला बिबट प्रवण क्षेत्र घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे अनेक शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.
मोहरी येथील सुखदेव श्रीरामे यांनी रात्री गोठ्यात बैल बांधला होता. बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला करून ठार केले. सकाळी घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश श्रीरामे, संजय श्रीरामे, धोंडीबा तोंडे, सौरभ तोंडे, सुजीत तोंडे, बाळू तोंडे, दिगंबर हळनावर उपस्थित होते.
खर्डा परिसर रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांची देखभाल करण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जातात. ज्वारी खुरपणीला आल्याने महिलांना रानात जावे लागते, मात्र त्यांनीही भीती व्यक्त करीत एकत्र पाच सहा ते शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र जावे लागत आहे. ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, तसेच गस्त वाढवण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
त्यामुळे वन अधिकारी धर्मवीर तोरांबे व राघू सुरवसे यांनी ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी रात्री एकटे बाहेर न पडणे, हातात काठी किंवा शस्त्रासारखे साधन ठेवणे, मोठी बॅटरीजवळ बाळगणे, मोबाइलवर आवाज ठेवून फिरणे, तसेच शेतात जाताना दोन-तीन जणांच्या गटाने जाण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांच्या मागणीवर वन विभागाने दोन पिंजरे बसवण्याचे आश्वासन दिले आहे.