नगर: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 पर्यंत केवळ एकगठ्ठा मतांसाठीच मराठा समाजाचा वापर केला मात्र आरक्षण दिले नाही, ही शोकांतिका आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची पुनर्रचना केली. आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावरून वर्षानुवर्षे राजकारण केले गेले, पण समाजाला आरक्षण देणारे ते एकमेव नेते आहेत, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मंत्री नरेंद्र पाटील यांनी केले.
भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर व दक्षिण जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष व पदाधिकार्यांच्या बैठकीत बुधवारी (दि.6) मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, युवराज पोटे, विवेक नाईक, विचार भारतीचे सुधीर लांडगे, बाळासाहेब महाडिक, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रिया जानवे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, सोमनाथ पाचारणे, सुनील थोरात, शुभांगी सप्रे, विद्या शिंदे आदींसह शहरातील व जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, राज्यात 2016 साली नगरमध्ये कोपर्डीची घटना घडल्यानंतर राज्यातील मराठा समाज एकत्र आला. भाजपच्या पदाधिकार्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्य व योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्यांना गरज आहे त्यांना आर्थिक सहकार्य मिळवू देत पायावर उभे करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
अनिल मोहिते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील हे पहिले कुटुंबीय आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच 300 कोटी रुपयांचा भरीव निधी या महामंडळाला दिला आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा भव्य मेळावा लवकरच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले की, मंत्री नरेंद्र पाटील हे तळमळीने मराठा समाजासाठी राज्यभर काम करत आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.