आषाढी पायी सोहळा Pudhari
अहिल्यानगर

Wari 2025: माऊलींच्या दिंडीचे 19 जूनला प्रस्थान; ही आहेत पालखी मुक्कामाची ठिकाणे

Ashadhi Wari 2025: नेवासा-गंगापूर तालुक्यांतील 50 दिंड्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Aashadhi Wari 2025: येथील संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पायी सोहळ्याचे येत्या 19 जून रोजी श्री.क्षेत्र नेवासा येथून श्री.क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संस्थानकहून पालखी प्रस्थान कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्यात नेवासा तसेच गंगापूर तालुक्यांतील पन्नासहून अधिक दिंडया सहभागी होणार आहेत. माऊलींच्या दिंडीची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचे जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांनी सांगितले.

हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुख्य मंदिर प्रांगणातून 19 जून रोजी दुपारी 3 वाजता प्रस्थान ठेवणार आहे. नेवासा शहर प्रदक्षिणा व नंतर सायंकाळी हा पालखी सोहळा प्रभाग चारमधील आराध्या लॉन्स येथे मुक्कामी राहील. पालखीचा 19 दिवसांचा प्रवास होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी संत ज्ञानेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान व माऊली भक्त परिवार यांनी केले आहे.

येत्या 20 जूनला पालखी सकाळी नेवासा शहरातून पंंढरपूरकडे मार्गस्थ होईल. नेवासा फाटा, उस्थळ दुमाला मार्गे वडाळा बहिरोबा येथे मुक्कामी राहील. 21 जूनला शिंगवे फाटा, 22 जूनला धनगरवाडी, 23 जूनला अहिल्यानगर येथे दुपारी मिरवणूक होऊन याच ठिकाणी मुक्काम राहील. 24 जूनला रुईछत्तीशी, 25 जूनला थेरगाव, 26 जूनला माहीजळगाव, 27 जूनला चापडगाव, 28 जूनला करमाळा देवी, 29 जूनला जेऊर स्टेशन, 30 जूनला कंदर, 1 जुलैला वेनेगाव, 2 जुलैला करकंब, 3 जुलैला पंढरपूर येथे मुक्काम. 4 जुलैला पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा होणार आहे.

दिंड्यांना सुविधा उपलब्ध करून देणार: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्यांना मुक्कामाची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, अखंडपणे वीज, आरोग्य व शौचालये आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करा, पंढरपूरला जाणार्‍या दिंड्यांची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

आषाढी वारी नियोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व दिंडीप्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, हभप अशोक सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून 260 दिंड्या करमाळामार्गे सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग निर्हेण ते शेगुडपर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरुस्त कराव्यात. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मूलभूत सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत.

या वर्षी पालखीच्या सुरुवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकर्‍यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी - कर्मचार्‍यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत, त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकर्‍यांची मुक्कामाची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी - निर्मल वारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकर्‍यांच्या अडचणी या वर्षी दूर केल्या जातील. वारकर्‍यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ यांनीही वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने काही सूचना केल्या. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील 76 दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

‘हरित वारी - निर्मल वारी’ उपक्रम

दिंडी मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकर्‍यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत तसेच दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथे पोलिस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी - निर्मल वारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT