महायुती हे फोडाफोडी आणि पक्ष व चिन्ह चोरून आलेले सरकार आहे. ते उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरू शकत नाही. त्यांना तो अधिकार नाही, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ झालेल्या युवा निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके, आमदार थोरात व अमित देशमुख आदी उपस्थित होते.
समुद्रातील वादळात जहाज भरकटायला लागते, तेव्हा समोर असलेला दीपस्तंभ मार्गदर्शन करतो. त्याप्रमाणे आमदार थोरात महाराष्ट्राच्या राजकारणातील दीपस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार काढून कोल्हे म्हणाले, की महायुतीला लोकसभेमध्ये मतांची कडकी पडली म्हणून आठवली बहीण लाडकी. पंधरा लाख रुपये देण्याचे आश्वासन देणारे पंधराशे रुपये देत आहेत. हा सुद्धा त्यांचा चुनावी जुमला आहे.
आमदार अमित देशमुख म्हणाले, की आ. थोरात यांनी स्वकर्तृत्वातून राज्यात आपली व तालुक्याची ओळख निर्माण केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून या वेळी संगमनेरकरांना मोठी संधी आहे.
खासदार लंके म्हणाले, की पूर्वेकडचे काही लोक संगमनेरमध्ये खेटण्यासाठी आले. इथे खरा वाघ आहे. वाघाच्या भीतीने हे घाबरून पळाले. आता त्यांना मतदारसंघाच्या बाहेरसुद्धा येता येत नाही. आमदार थोरात म्हणाले, की संगमनेर तालुक्याबरोबरच राहाता तालुक्यामध्येही आपल्याला दुरुस्ती करायची आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. जयश्री थोरात यांनी प्रास्ताविक केले.