नगर: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने यंदाचे राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य नाट्यसंमेलनाचे यजमानपद अहिल्यानगरच्या मसापच्या सावेडी उपनगर शाखेला मिळाले आहे. अहिल्यानगरमध्ये 11 व 12 सप्टेंबरला साहित्यिकांच्या मांदियाळीने हा साहित्योत्सव रंगणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेला या संमेलनाचे यजमानपद नुकतेच बहाल करण्यात आले आहे. मसापच्या सावेडी उपनगर शाखा व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे साहित्य संमेलन न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात हे दोन दिवसीय संमेलन होणार आहे, अशी माहिती मसापच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, मसापच्या सावेडी उपनगर शाखेने यापूर्वीही नगरमध्ये विभागीय साहित्य संमेलन यशस्वीरीत्या संपन्न केले आहे. या शाखेने विविध उपक्रम यशस्वी केल्याच्या कामाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य शाखेने घेतली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा सावेडी उपनगर शाखेला राज्यस्तरीय संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या व आश्वासक भूमिकेनेच आम्ही पार पाडणार आहोत.
सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर म्हणाले, दोन दिवस चालणार्या या संमेलनाच्या आयोजनाची तयारी सावेडी उपनगर शाखेचे पदाधिकारी व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या समितीने सुरू केली आहे. साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नामवंत प्रकाशकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
ग्रंथदिंडी, शानदार उद्घाटन सोहळा, परिसंवाद, निमंत्रितांचे काव्य संमेलन, विशेष म्हणजे कवीकट्टा आयोजित करण्यात आला आहे. महाचर्चा, एकांकिका, संगीत रजनी कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, प्रख्यात कवींचे संमेलन, नाट्य क्षेत्रातील तसेच साहित्यिकांचा गौरव व प्रकट मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे न्यू आर्ट्स कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी दिली.