नगर: अंगणात रंगीबेरंगी रांगोळी, पणत्यांसह आकाशकंदिलाचा लखलखाट आणि फटाक्यांची आतषबाजी... त्यातच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटीचे अनुदान बँक खात्यात येत असल्याची गोड बातमी... अशा आनंददायी वातावरणात दिवाळी गोड होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने दिवाळीच्या मुहूर्तावरच शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी 846 कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. (Latest Pimpri chinchwad News)
अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना एकूण 846 कोटी 96 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. शासनाने महसूल आणि कृषी विभागाला ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर महसूल आणि कृषी विभागांनी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास प्रस्ताव पाठविला होता. शासनाने तत्परतेने निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणींना हातभार लागणार आहे.
सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम
जिल्हा प्रशासनाने अँग्रीस्टॅक व फार्मर आयडीनुसार मंगळवारी अनुदान शेतकऱ्यांना वाटण्यास मंजुरी दिली आहे. शासनस्तरावर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सव्वालाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दीडशे कोटींवर रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यांनाही दिवाळी काहीशी आनंदात साजरी करता येणार आहे.