जामखेड: अरणगावमध्ये सलग दुसर्या दिवशी जोरदार वादळी पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक लिंबोणीच्या बागा उन्मळून पडल्या असून, शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कवडगाव येथील अंजना मल्हारी खाडे यांच्या घरावर झाड कोसळून अंशतः नुकसान झाले आहे.
पाटोदा येथील रेखा काळे यांच्या घराचे पत्रे उडाले असून, घरातील संसारोपयोगी सामानाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह घरांचेही आणि फळबागाचेही मोठे नुकसान झाले. एक तास झालेल्या पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. (Latest Ahilyanagar News)
जामखेड तालुक्यावर निसर्गाने सलग चौथ्या दिवशी कहर केला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील अरणगाव, पारेवाडी, फक्राबाद, पिंपरखेड, धानोरा, वंजारवाडी, कवडगाव, पाटोदा आणि डोणगाव या गावांमध्ये वादळी वार्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वार्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. कवडगाव ते अरणगावला जोडणार्या रस्त्यावर मोठे लिंबाचे झाड पडल्याने रस्ता काही काळ बंद होता. याच रस्त्यावर विजेचे खांब पडल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अरणगावमध्ये सलग दुसर्या दिवशी पावसाने दाणादाण उडवत जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी 3 ते 4 दरम्यान झालेल्या पावसाने जामखेड-श्रीगोंदा रस्त्यावर विजेचा खांब पडल्याने 2 तास वाहतूक कोंडी झाली होती. पावसातच महावितरणच्या कर्मचार्यांनी तत्काळ विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. कर्मचार्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. बाजारपेठांमध्येही या पावसाचा फटका बसला असून, दुपारी पाऊस झाल्याने बाजारपेठा लवकर बंद झाल्या.
तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी नुकतीच खरीप हंगामाची पेरणी सुरू केली होती. मात्र, या पावसामुळे त्यांच्या कामात खंड पडला असून, पुन्हा पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पन्नासहून अधिक फळबागांचे नुकसान
अरणगावला दोन दिवसांपासून वादळी वार्यासह मुसळधार पाऊस होत असल्याने परिसरात पन्नासहून अधिक जास्त शेतकर्यांच्या लिंबोणीच्या बागांचे नुकसान झाले. लिंबांसह फळझाडे उन्मळून पडल्या. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी सरपंच अंकुश शिंदे यांनी केली आहे. कवडगाव येथील प्रगतशील शेतकरी शत्रगुण राऊत यांनी यांच्या लिंबोणीची बागही भुईसपाट झाली. कवडगाव येथील शेतकरी हरिश्चंद्र मुरलीधर शेवाळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.