शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगा, तसेच वन विभागाचे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. खासगी डोंगररांगा ही मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्याच्या सीमेलगत असणार्या इतर भागांनी उसाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते.
ऊसाच्या शेतात पावसाचे पाणी व चिखल झाल्यामुळे त्या भागातील बिबट्यांनी तालुक्यातील डोंगररांगांनी स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे जाणवते. (Latest Pune News)
नगर तालुक्याच्या सीमेलगत असणार्या राहुरी, नेवासा, श्रीगोंदा तालुक्यामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते.विशेषतः राहुरी व नेवासा तालुक्यामध्ये ऊसाच्या शेतामध्ये वावरणार्या बिबट्यांची संख्या देखील मोठी आहे.
पावसाळ्यात उसाच्या शेतामध्ये पाणी साचते व मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे बिबट्यांना चालणे व शिकार करण्यात अडचण निर्माण होते. अशावेळी उसाच्या शेतातील बिबटे स्थलांतर करत नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांनी आश्रयाला येतात. पावसाळ्यातच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आढळून येतो. तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना देखील याच कालावधीत जास्त होत असल्याचे वन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जून ते डिसेंबर या दरम्यान उसाच्या शेतामध्ये पाणी साचत असते. याच कालावधीमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आढळून येतो. तसेच पशुधनाच्या शिकारीच्या घटना देखील याच कालावधीत अधिक होत असल्याचे वनविभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2024 मध्ये तालुक्यामध्ये सुमारे चारशे पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडल्या होत्या.
उत्तरेकडील संगमनेर, अकोला, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आढळते. उसात बिबट्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. पावसाळ्यात या तालुक्यामधून बिबटे स्थलांतर करून डोंगररांगा असलेल्या नगर तालुक्यात येत असल्याचे केलेल्या निरीक्षणांमधून स्पष्ट झाले आहे.
एप्रिल 24 ते डिसेंबर 24 या नऊ महिन्यांच्या कालावधीतच 100 पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना नगर तालुक्यात घडल्या आहेत. यामध्ये पशुपालकांना 11 लाख 52 हजार 50 रुपयांचा आर्थिक मोबदला वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे. ही आकडेवारी खासगी क्षेत्रातील झालेल्या शिकारींचीच आहे. वनहद्दीत बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची शिकार केल्यास त्या घटनेचा पंचनामा अथवा मोबदला मिळत नाही.
तालुक्यातील जेऊर, डोंगरगण, मांजरसुंबा गड, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, विळद, देहरे, आगडगाव, देवगाव, रांजणी, माथणी, सारोळा कासार, चास, अकोळनेर, भोरवाडी, धनगरवाडी, गुंडेगाव, उदरमल, खोसपुरी या पट्ट्यात असणार्या डोंगररांगांनी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
पाथर्डी, राहुरी आणि नेवासा या तीन तालुक्यांची सीमा असलेल्या इमामपूर तसेच डोंगरगण परिसरातून बिबट्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत असल्याने शेतकर्यांनी कुटुंबाची, लहान मुलांची तसेच पशुधनाची दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बिबट्यांसाठी नंदनवन !
तालुक्यात हरीण, काळवीट, ससा, रानडुक्कर, साळींदर, लांडगा, कोल्हा, तरस, खोकड, उदमांजर, मोर याचबरोबर विविध जातींचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. सहज मिळणारी शिकार अन् मोठ्या प्रमाणात असलेले लपण यामुळे परिसर बिबट्यांना आकर्षित करत असतो. तालुका बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे.
जंगलातील वाढलेला मानवी हस्तक्षेप यामुळे बिबटे मानव वस्तीकडे धाव घेतात. पशुधन बंदिस्त जागेवर बांधावे. बिबट्या दिसल्यास त्याची छेड न काढता वनविभागाशी संपर्क साधावा. कोणत्याही वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य करू नये.-मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग
इतर तालुक्यांमधून उसाच्या शेतात पाणी साचल्याने पावसाळ्यात डोंगररांगांकडे बिबटे स्थलांतर करीत असतात. या कालावधीत तालुक्यातील बिबट्यांची संख्या वाढत असून सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. पशुधन, लहान मुले तसेच शेतात काम करताना शेतकर्यांनी आपली काळजी घ्यावी.-अविनाश तेलोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी