राहुरी : भक्ष्याच्या शोधात भटकणाराबिबट्या थेट विहिरीत पडला. ही घटना तालुक्यातील कनगर परिसरात 20 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे घडली. ही माहिती कळताच वन कर्मचार्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन, स्थानिक तरुणांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून, पुन्हा पिंजर्यात जेरबंद करताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
कनगर येथील शेतकरी नितीन रघुनाथ घाडगे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पहाटे भक्ष्याच्या शोधात फिरताना चुकून विहिरीत पडला. (Latest Ahilyanagar News)
सकाळी घाडगे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याशी संपर्क साधून, माहिती दिली. वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे, वनरक्षक महेश ससे, संदीप कोरके, निलेश जाधव, वन कर्मचारी बाळासाहेब दिवे, घनदाट झावरे, सदू मामा व वाहन चालक ताराचंद गायकवाड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी घेवून, सर्वांनी बिबट्या बचावकार्य सुरू केले.
शेतकर्यांसह गावकर्यांच्या मदतीमुळे बिबट्या जखमी न होता, सुरक्षितरीत्या विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. यानंतर वनविभाग कर्मचार्यांनी त्याला जेरबंद केले. वन कर्मचार्यांच्या वेळेवर व शिस्तबद्ध कामगिरीमुळे बिबट्या सुरक्षितरीत्या विहिरूतून बाहेर काढण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला.
अनेकांनी घेतले बिबट्याचे थेट दर्शन!
बिबट्या विहिरीत पडल्याची चर्चा वार्यासारखी पसरताच, कनगर परिसरातील ग्रामस्थांसह तरुणांनी घटनास्थळी मोठी गर्दी झाली. अनेकांनी बिबट्याचे थेट दर्शन घेण्यासाठी शेताकडे धाव घेतली. यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वनविभाग पथकाने शिस्त राखून, बचाव मोहीम यशस्वी पूर्ण केली. आकाश दिवे, करण दिवे, सचिन दिवे, सत्यम ओहळ, सिराज इनामदार या तरुणांनी बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला. वनकर्मचार्यांना मदत करून, त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.