राहुरी : राहुरी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढतच आहे. वन विभागाचा हलगर्जीपणा सर्वसामान्यांना भेडसावत असून मानोरी (ता. राहुरी) येथे शेतकरी बिबट्याच्या हल्यात बालंबाल बचावला आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
राहुरी वन विभागाचा कारभार हाती घेतलेले वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्यांसह शेतकर्यांना भेडसावत आहे. काही दिवसांपूर्वीच वरवंडी हद्दीमध्ये बिबट्याने हल्ला करीत वेदिका श्रीकांत ढगे (4 वर्ष) या चिमुरडीला भरदिवसा बिबट्याने आई वडिलांसमक्ष उचलून नेत बळी घेतला होता. त्यानंतर पुन्हा बिबट्याने दिवसा दर्शन देत दुचाकी चालकावर हल्ला केला होता. वन विभागाने त्यावेळी एका बिबट्याला पिंजर्यात अडकवत हल्लेखोर बिबट्या पकडल्याचा कांगावा करीत बिबट्यावरून वन विभाग विरोधातील रोष शमविला होता.त्यानंतर पुन्हा राहुरी हद्दीत दिवसाढवळ्या तसेच रात्री-अपरात्री बिबट्याचे दर्शन होऊ लागले. इतकेच नव्हे तर बारागाव नांदूर रस्त्यालगत एक नव्हे तर 4 बिबट्यांचा कळप एकत्र वावरत असताना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला. पुरावे दिल्यानंतर वन विभागाने जागे होत कसेबसे पिंजरा लावत बिबट्या पकडण्यासाठी चक्रव्यूह आखला. परंतु वन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस येऊन पिंजर्यात अडकलेला बिबट्या काही कालखंडातच पळून गेला. वन विभागाने नादुरुस्त पिंजरा बसविल्याने बिबट्या पळून गेला. त्यावेळी वन विभाग विरोधात तक्रार देऊनही वरिष्ठांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.
परिणामी काही दिवसातच बिबट्याने ताहाराबाद हद्दीमध्ये पुन्हा भरदिवसा हल्ला करीत गागरे वस्तीवर खेळणार्या एका 6 वषीय चिमुरड्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या रुद्रला वडिल सचिन गागरे यांनी मुलाला बिबट्याच्या तावडीतून वाचविले. त्यानंतर पुन्हा बिबट्याने कोंढवड हद्दीमध्ये अमोल सरोदे या तरुणावर रस्त्यावर जात असताना हल्ला चढविला. त्या हल्यानंतर पुन्हा बिबट्याने राहुरी परिसरात डरकाळी फोडत शेतात पीकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वयोवृद्धावर भरदिवसा हल्ला केला. खंडेराव मुरलीधर शेटे (69 वर्ष) हे आपल्या गोटूंबे आखाडा हद्दीतील शेती क्षेत्रामध्ये दुपारी 1.30 वाजता गेले असताना त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली. वृद्धाला बिबट्या उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना शेटे यांनी दगड, काठी व हातात येईल त्या साहित्याने प्रतिकार केल्याने ते बालंबाल बचावले. या घटना घडत असतानाही केवळ बघ्याची भूमिका घेतलेल्या वन विभागाच्या गलथान कारभाराने देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी हद्दीत धुमाकूळ घालत पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या.
हा सर्व प्रकार घडत असतानाही झोपेचे सोंग पांघरलेल्या वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे काल दि. 16 ( रविवारी) सकाळीच बिबट्याने एका शेतकर्याची ऊस तोडणी सुरू असताना दर्शन दिले. आण्णासाहेब तोडमल या शेतकर्याच्या शेतीमध्ये ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याने दर्शन दिले. भरदिवसा बिबट्या दिसल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. गर्दी पाहता ऊस क्षेत्रात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पळ काढत लगतच्या गिन्नी गवतात आसरा घेतला. गिन्नी गवत कापणी करणारे विठ्ठल हापसे यांना बिबट्या आपल्या क्षेत्रात लपून बसल्याचे समजलेच नाही. बिबट्याने हापसे यांना पाहताच हल्ला केला. बिबट्याच्या हल्याला परतून लावत हापसे यांनी आपला बचाव केला. गर्दी जमा झाल्याचे पाहून बिबट्याने धूम ठोकली. मानोरी गावातील खाजगी रुग्यालयाचे डॉ. अजिंक्य आढाव यांनी प्राथमिक उपचार करीत हापसे यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.
बिबट्याने त्यानंतर अमजद पठाण यांच्या शेतात आसरा घेतल्याचे समजले. सर्व घटना घडून गेल्यानंतर उशिरा दाखल झालेल्या वन विभागाने नेहमीप्रमाणे बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला.