लोणी : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल दीड महिना शेळी पिंजर्यात ठेवली, मात्र तरीही बिबट्या अडकला नाही. अखेर शेतकर्यांनी कंटाळून शेळी बाहेर काढली, ती पिंजर्याबाहेर चारा खात असताना बिबट्याने संधी शोधून तिच्यावर हल्ला करत फडशा पाडल्याची घटना लोणी बुद्रुक येथील म्हस्के वस्तीवर रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या मालकीची ही शेळी होती. (Ahilyanagar Latest News)
दीड महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याचा एक बछडा विहिरीत पडला होता. त्याला बाहेर काढून अधिवासात सोडले. पण त्याची आई याच ठिकाणी वास्तव्यास असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जायला धजावत नव्हते.वन विभागाने याठिकाणी पिंजरा लावला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या मालकीची शेळी पिंजर्यात ठेवण्यात आली. बिबट्या अनेकदा पिंजर्या जवळ आला पण तो पिंजर्यात गेला नाही. दीड महिना झाला तरी तो जेरबंद होईना. शेळीला रोज अन्न पाणी द्यावे लागत होते. शेवटी सकाळी शेळी पिंजर्या बाहेर काढून गवत खाण्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला.
रविवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी चरण्यासाठी बाहेर काढली. वस्तीवरील कामगार सोपान बोरसे शेळीपासून काही अंतरावर शेतीचे काम करीत होता. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उसातून आलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ओढत नेत असताना सोपान त्याच्यामागे धावला. बिबट्याने शेळी टाकून उसात धूम ठोकली.मात्र शेळीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती वन संरक्षक प्रतीक गजेवार व वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के यांना दिल्यावर ते घटनास्थळी आले.मृत शेळीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, दादासाहेब म्हस्के, प्रवीण म्हस्के,विजय जगताप, शशिकांत म्हस्के,अजय बोधक,रमेश घोलप आदी उपस्थित होते. लोणी बुद्रुक परिसरात बिबट्यांची संख्या खूप वाढली असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी या भागात बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांना जीव गमवावा लागला होता.