Leopard Attack Khare Karjune: खारे कर्जुने येथे बिबट्याचा हल्ला Pudhari
अहिल्यानगर

Leopard Attack Khare Karjune: खारे कर्जुने येथे बिबट्याचा हल्ला; चिमुरडीला उचलून नेल्याने ग्रामस्थांत भीतीचं वातावरण

नगर तालुक्यातील खारे कर्जुने भागात अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला; शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका : तालुक्यातील खारे कर्जुने येथे घरासमोर अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरून बिबट्याने उचलून नेले. रियंका सुनील पवार असे या चिमुरडीचे नाव असून, बुधवारी (दि. 12) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी परिसरात तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.(Latest Ahilyanagar News)

कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुरडीचा आणि पाठोपाठ पाच दिवसांनी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी खारे कर्जुने येथे बिबट्याने सहा वर्षांच्या मुलीला तिच्या अंगणातून उचलून नेले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून, बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मिळालेली माहिती अशी की, खारे कर्जुने येथे शेतामध्ये काही कुटुंबे शेतमजून म्हणून काम करत आहेत. शेतावर वस्ती असल्याने पवार कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडेसहा वाजता शेकोटी करून शेकत बसले होते. घरासमोर अंगण आणि त्यासमोर तुरीचे शेत आहे. रियांका सुनील पवार ही चिमुरडी अंगणात खेळत होती. त्याच वेळी तुरीच्या शेतातून बिबट्या आला आणि घरच्या लोकांसमोरून रियंकाला उचलून नेले. रियंकाची आई तेथेच काम करत होती. चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकून संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. तिच्या आईसह सर्व जण आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धावले. प्रयत्न केला पण काही हाती लागले नाही. काही क्षणांत बिबट्या तुरीच्या शेतात दिसेनासा झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक गोळा झाले. तब्बल एक ते दीड तास संपूर्ण तुरीचे शेत लोकांनी पिंजून काढले. मात्र, रियंकाचा शोध लागला नव्हता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक माणिक चौधरी व त्यांचे पथक आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत ड्रोनच्या साह्याने चिमुरडीचा शोध सुरू होता.

नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कालच कामरगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. खारे कडर्जुने शिवारातही बिबट्याचा वावर आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

...आणि पिंजरा गावातच राहिला!

खारे कर्जुने परिसरात दिवाळीच्या अगोरदच बिबट्याचा वावर होता. शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याने वन विभागाकडे पिंजरा बसविण्याची मागणी केली जात होती. वन विभागाने गावात पिंजरा आणलाही होता. मात्र, त्याच्या गजांना वेल्डिंग करावयाची असल्याने तो गावात ठेवला होता. त्यामुळे बिबट्या मोकाट होता. बुधवारी सायंकाळी त्याच बिबट्याने चिमुरडीला उचलून नेले वन विभागाचा पिंजरा मात्र गावातच राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT