छावनी परिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी मिळून रहिवाशांकडून अंदाजे 3.5 कोटी रुपये येणे बाकी असल्याने विकासकामे रखडली आहेत. तसेच वसूली होत नसल्याने छावनी परिषदेस मिळणार्या निधीस सुध्दा अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे छावनी परिषदेने थकबाकीदारांना वकीलामार्फत नोटीस बजावण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, छावनी परिषदेकडून मालमत्ताधारकांवर वॉरंट बजावून वसूली करण्यात येत आहे.
मोरे म्हणाले, छावनी परिषद क्षेत्रामधील नागरिकांना वारंवार घरपट्टी व पाणीपट्टी व इतर देय रक्कम छावनी परिषद कार्यालयात जमा करण्याबाबत सुचना देऊनही नागरिकांनी भरणा न केल्याने ही कारवाई सुरू आहे.थकबाकीदारांना वकीलामार्फत नोटीस बजावून त्याच्यावर होणारा खर्च हा मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यात येत आहे. तसेच वकिलाच्या नोटीस मिळूनही ज्या मालमत्ताधारकांनी देय असलेल्या घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न केल्यास छावनी अधिनियमांतर्गत अशा मालमत्ताधारकांवर जिल्हा न्यायालयामार्फत वसूलीचा दावा दाखल करुन वसूली करण्यात येत आहे. मागिल महिन्यात भिंगार तसेच इतर 20 मालमत्ताधारकांवर वसूली दावा दाखल आहे. तसेच 15 मालमत्ताधारकांवर वॉरंट बजावून वसूली करण्यात येत आहे. वॉरंट बजावल्यानंतर विहीत मुदतीत देय रक्कम न भरल्यास सदर मालमत्ताधारकांच्या चल संपत्तीची जप्ती करुन लिलावाद्वारे देय रक्कमेची वसूली करण्यात येईल, अशी माहीती छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी दिली.
दरम्यान, छावनी परिषदेस देय असलेल्या घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा करुन छावनी परिषदेस सहकार्य करावे व कार्यवाहीचा बडगा टाळवा, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे.