कर्जत: कुकडी प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५७०४ कोटी ५० लाख रुपयांची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. बहुप्रतीक्षित डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाचाही यामध्ये समावेश करण्यात आला. या प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळवून साठविण्यात येणार आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊन कर्जत, पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा तालुक्यांना एक अतिरिक्त आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. कर्जत-जामखेडसारख्या दुष्काळी भागाला अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी आमदार पवार यांनी हा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बोगद्याला मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, कोविड संकट आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. तरीही आमदार पवार यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा थांबवला नाही.
तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सुधारित प्रशासकीय मान्यतेत बोगद्याचा समावेश झाल्याने आता प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
कर्जत-जामखेडसारख्या दुष्काळी भागासाठी अतिरिक्त पाणी आणणे महत्त्वाचे होते. त्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील, अजित, पवार तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मदत झाली.-आमदार रोहित पवार