कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे सामना? नगराध्यक्षपदासाठी ओबीसीमध्ये चुरस Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Municipal Election 2025: कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे सामना? नगराध्यक्षपदासाठी ओबीसीमध्ये चुरस

ओबीसी आरक्षणामुळे कोपरगाव निवडणुकीत नवे राजकीय समीकरण; महायुती-आघाडी गटात हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असल्यामुळे काळेंविरुद्ध कोल्हे आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटात चुरस निर्माण झाली आहे. विविध गटा-तटाच्या बैठकांनी जोर धरला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर ओरिजनल ओबीसींनाच नगराध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी मागणी जोर धरीत आहे. यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागंतीची झाली आहेत. काही झाले तरी, ही निवडणूक काळे- कोल्हे गटाभोवतीच फिरणार, हे मात्र निश्चित (Latest Ahilyanagar News)

अखेर नगर पालिका निवडणुकीचे तब्बल साडेतीन वर्षांनंतर रणशिंग फुंकले आहे. कोपरगावात इच्छुक उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे. कोरोना काळानंतर साडेतीन, चार वर्षांनंतर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच, कोपरगावात राजकीय तापमानाचा पारा वर-वर चढत आहे. नव्या उमेदीने अनेकांनी गुडघ्याला वाशिंग बांधले आहे. मतदारांच्या उंबरठ्यांवर माथा टेकणे, पाया पडणे, शुभेच्छा संदेश देण्यासह सोशल मिडियावर ‌‘आपणच कसे लायक‌’ याबाबत जोरात मोहीम आखणे सुरू झाले आहे.

निवडणुकांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अर्ज दाखल करणे 10 ते 17 नोव्हेंबर, छाननी : 18 नोव्हेंबर, माघार 21 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर तर, मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

एकीकडे काही दावेदार मंदिरात दर्शन घेवून, देवाला साकडे घालताना दिसत आहेत, तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या दारात फेऱ्या वाढल्या आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, सोशल मिडियावरील ‌‘विकास वचनांचा पाऊस‌’ व शुभेच्छांचा जणू महोत्सव रंगताना दिसत आहे.

ज्यांनी पाच वर्षांत प्रभागात तोंडही दाखवलं नाही. प्रभागात कवडीचे काम केले नाही, अशा काही चेहऱ्यांविषयी मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा रंगत आहे.

पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग

गटांतर्गत समन्वय व आघाडी धर्म पाळणे ही स्थानिक नेतृत्वापुढील आव्हान ठरणार आहे. काही ‌‘राजकीय सुट्टीवाल्यांनाही‌’ अचानक निवडणूक आठवल्याची चर्चा सुरु आहे. या लढतीत अनपेक्षित चेहरे दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोपरगावात पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्यांनी 5 वर्षे साधना केली, त्यांच्या दाव्यासाठी येणारे दिवस निर्णायक ठरणार आहेत, हे मात्र तितकेच खरे!

काळे- कोल्हे गटांकडून स्वतंत्र उमेदवारांचा सुगावा

महायुतीतील काळे- कोल्हे गट एकत्र येण्याची शक्यता अत्यल्प आहे. या दोन्हींकडून स्वतंत्र उमेदवारांचा सुगावा लागतोय. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे सेनेचे राजेंद्र झावरे चर्चेत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसही पर्याय खुले ठेवून पावले टाकत आहे. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत 30 जागा आहेत. त्यात 15 महिलांचा समावेश असल्यामुळे राजकीय समीकरणे बिघडल्याची चर्चा सुरु आहे.

इच्छुकांचे गणित कोलमडले

आरक्षणाचा फटका बसल्यामुळे अनेकांनी धावपळ सुरू केली आहे. पालिकेत 30 जागा आहेत. त्यात 15 महिला असल्यामुळे या बदललेल्या समीकरणामुळे तब्बल पाच वर्षे उमेदवारीच्या तयारीत असलेल्या अर्ध्याहून अधिक इच्छुकांचे राजकीय गणित अक्षरशः कोलमडले आहे. विविध प्रभागात एका जागेसाठी तब्बल 4 -5 दावेदार अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT