कोपरगावः शहरात काही महिन्यांपूर्वी राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेत तब्बल 800 पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली. यासाठी 10 लाख 1, 761 रुपयांचा खर्च जीएसटीसह झाला आहे. हा सर्व खर्च कोपरगाव नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी, तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली.
कोपरगाव शहरात राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत माहिती देताना प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील आरणे म्हणाले की, शहरासह मुख्य रस्ता व प्रभागांमधील तब्बल 800 पेक्षा जास्त अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
यासाठी 14 जेसीबी, 4 डंपर व 4 ट्रॅक्टर्रचा वापर करण्यात आला. अतिक्रमणातून काढलेले मटेरियल व राडा उचलण्यास आठवड्याचा कालावधी लागला. सलग दोन दिवस तब्बल 13- 14 तास अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. याकामी पालिकेचे आरोग्य कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
कोपरगावात आत्तापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये तीनदा अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. त्यावर झालेला सर्व खर्च पूर्णतः वाया गेला, अशी नाराजी अनेक नागरिकांनी व्यक्त केली, मात्र त्यांचे पुणर्रवसन झाले नाही, अथवा कोणत्याही प्रकारच्या खोका शॉपबाबत निर्णय पालिका प्रशासनाने घेतला नाही. विविध राजकीय पक्षांनी अतिक्रमणधारकांच्या केवळ बैठकाचं घेतल्या.
मुंबई दरबारी प्रश्न मांडले, आश्वासने दिली, पण हा प्रश्न आत्तापर्यंत अनुत्तरीतच राहिला. आता पुन्हा अतिक्रमणे हटविलेल्या जागांवर पुन्हा नागरिकांनी दुकाने थाटली आहेत. पालिका प्रशासन वेळोवेळी, ‘अतिक्रमणे करू नका. हातगाड्या रस्त्यावर लावू नका, अन्यथा दंड करण्यात येईल,’ अशा सूचना शहरात स्पीकरवरून देते परंतू अतिक्रमणधारक त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. काहींना पालिकेने दंड आकारले, मात्र ही समस्या जैसे- थेच राहिली आहे. अतिक्रमणे काढताना पालिका प्रशासन व नागरिकांच्या हमरी- तुमरी झाल्याचे वास्तव दृश्य दिसले होते.
कोपरगावात अतिक्रमणे पुन्हा जैसे-थे!
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने आत्तापर्यंत तब्बल तीनदा राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेसाठी लाखो रुपयांचा खर्च पालिकेच्या फंडातून केला. ही रक्कम नागरिकांच्या कररुपी पैशातून खर्च केली, मात्र ती रक्कम पूर्णतः वाया गेली आहे. कारण शहरात अतिक्रमणे पुन्हा जैसे-थे दिसत आहेत. या गैरप्रकाराबाबत जागरुक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोपरगावात मोकाट जनावरांसह श्वान व मोकाट गाढवांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढला आहे. एकंदरीत पालिकेच्या समस्या सुटता- सुटत नाहीत, अशीच बिकट परिस्थिती दिसत आहे.