Kishtwar Encounter Akole Soldier Sandeep Gaikar Funeral
अकोले : भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमधील जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) हे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अकोलेतील ब्राह्मणवाड्यात शासकीय लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यर्थ न हो...बलिदान....अमर रहे... अमर रहे.... संदीप गायकर अमर रहे, भारत माता की जय, वन्दे मातरम् च्या जयघोषात दोन वर्षाच्या रियांशसमोर संदीप यांना मानवंदना देण्यात आली. आई आणि चिमुकल्या रियांशला रडताना बघून उपस्थित ग्रामस्थांचेही डोळे पाणावले.
२२ मे २०२५ रोजी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाड्याचे सुपुत्र, मराठा बटालियनचे जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. शहीद संदीप गायकर यांचे पार्थिव तिसऱ्या दिवशी मूळ गावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सैन्य दलाच्या वाहनातून ज्या विद्यालयात संदीप गायकर शिकले त्याच सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ .डॉ. किरण लहामटे, आ.अमोल खताळ, माजी आ.वैभव पिचड, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, जिल्हा बँकेचे संचालक सिताराम गायकर, सुभेदार किशोर मापारी,महामंत्री शंकर गायकर आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.
याप्रसंगी माजी खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे,पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक मोहन बोरसे,माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर ,अगस्ति देवस्थान, वारकरी सांप्रदायाचे हभप दिपक महाराज देशमुख व माजी सैनिकासह हजारोच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.
" भारत माता की जय" अशी घोषणा दिपाली गायकर या वीरपत्नीने दिली.तर भारतीय सैन्य दलातील जवानांनी व पोलिस दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करुन बलिदान व शौर्याला मानवंदना देण्यात आली.
एकुलता मुलगा गमावला
संदीप हे पांडुरंग गायकर यांचा एकुलता एक मुलगा, तरीही आई- वडिलांनी सैन्यात जाण्याच्या संदीपच्या इच्छेस प्रोत्साहन दिले.बारावी झाल्यानंतर त्यांनी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. गायकर यांना अडीच-तीन एकर जमीन असून तरीही मोलमजुरी आणि शेळी पालन करून कुटुंबाची गुजराण सुरू आहे. तर आर्थिक परिस्थितीमुळे आई-वडील वांगदरी (ता. संगमनेर) येथे तात्पुरते स्थायिक झाले आहेत. वांगदरी हे गाव शहीद संदीप गायकर यांच्या मामाचे गाव आहे. शहीद संदीप यांचे आई-वडील आजही वाघदरी येथेच राहतात. सध्या त्यांचा शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय आहे.
माझे पती घरी आले होते. 14 दिवसांपूर्वीच ते ड्यूटीवर परतले होते. देशाचे संरक्षण करताना माझ्या पतीला वीरमरण आले, त्यांनी देशासाठी खूप मोठे कार्य केले आहे. पतीला गमावल्याचं दु:ख तर भरपूर आहेच पण त्यांच्या देशसेवेचा अभिमान वाटतो, अशा भावना वीरपत्नी दिपाली गायकर यांनी व्यक्त केल्या. कडेवर दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन शहीद पतीला अखेरची मानवंदना देता त्यांना अश्रू अनावर झाले होते. ते दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दिपाली गायकर म्हणाल्या, आता कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. आई- वडील वयस्कर आहेत त्यांना मी सांभाळणार आहे. संदीप यांची इच्छा होती की आईवडिलांना सुखात ठेवायचे. तीच आता माझी इच्छा आहे, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत आईवडीलांना आनंदात ठेवीन.
ड्यूटीवर जाण्याआधी करायचे मेसेज
संदीप ड्युटीवर जाण्याआधी मला मेसेज करायचे मी कामात आहे कॉल करू शकत नाही. परंतू 23 मेला त्यांना पहाटेची ड्युटी असल्याने त्यांनी मेसेज केला नव्हता, हे सांगताना त्यांना रडू कोसळले.
शहीद स्मारक उभारणार!
संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आलेले आहे. आपल्या देशाच्या संरक्षणाकरता स्वर्गीय संदीप गायकर यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. नगर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी जवान शहीद झालेत त्या सर्व गावांमध्ये शहीद स्मारक उभा करण्याचा निर्णय करण्यात आला आहे - राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, अहिल्यानगर