खंडणीसाठी अपहरणाचा थरार! अडीच कोटींची मागणी; 11जणांविरुद्ध गुन्हा दाखल Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Kidnapping Case: खंडणीसाठी अपहरणाचा थरार! अडीच कोटींची मागणी; 11जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आणखी आरोपी कोण?

पुढारी वृत्तसेवा

Kidnapping for ransom

श्रीगोंदा: राहाता तालुक्यातील कापूस व्यापाऱ्याचे अपहरण करून अडीच कोटी रुपयांची खंडणीची मागणी करत 30 लाख 30 हजारांची खंडणी उकळणाऱ्या बाबासाहेब भाऊसाहेब जगताप, अजय शेळके, शुभम रामचंद्र महाडिक (रा. श्रीगोंदा) या तिघांसह इतर आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत देविदास मते (रा. निघोज, ता. राहाता) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मते यांची साई वरद इंडस्ट्री नावाची कंपनी असून, ते या माध्यमातून कापूस, मका खरेदी करतात. 2 सप्टेंबरला मते हे पुणे येथे कामानिमित्त जात असताना बाबासाहेब जगताप याने दूरध्वनी करून तुम्हाला भेटायचे आहे.  (Latest Ahilyanagar News)

त्यावर मते यांनी, 3 रोजी श्रीगोंदा येथे येणार असल्याचे सांगितले. फिर्यादी मते हे 3 रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असणाऱ्या गोडाऊनजवळ गेले. तिथे चांगदेव पवार हेही होते. बराच वेळ थांबल्यानंतर दुपारी पावणे एकच्या सुमारास बाबासाहेब भाऊसाहेब जगताप, अजय शेळके, शुभम रामचंद्र महाडिक व इतर आठ जण आले. त्यांनी आम्हाला दमदाटी करून तुमचे सर्व धंदे आम्हाला माहिती आहेत, असे म्हणत त्यांनी फिर्यादी मते यांना बळजबरीने चारचाकी मध्ये बसवले. त्या वेळी सोबत असणारा चांगदेव पवार घाबरून निघून गेला.

वरील तिन्ही आरोपींनी गाडीतून आडवळणी रस्त्यावर घेऊन गेले. तिथे अनोळखीने पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी बाबासाहेब जगताप व अजय शेळके या दोघांकडेही पिस्तूल होते.

त्यांनी मला दमदाटी करून अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी एक कोटी रुपये लगेच लागतील असे सांगितले. एवढे पैसे माझ्याकडे नाहीत असे त्यांना सांगितले. तरी त्यांनी मला पिस्तूल लावून व्हिडिओ बनवले. मी गोडाऊन घेतो व पेटवून देतो असे बोलायला भाग पाडले. त्याचबरोबर नग्न व्हिडिओ काढण्याची धमकी दिली.

अडीचच्या सुमारास फिर्यादी मते यांना एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. तिथेही पैशांची मागणी केली. मी चार-पाच मित्रांकडे पैशांची मागणी केली. माझे मित्र प्रसाद काते यांनी एसव्हीव्ही या कंपनीच्या खात्यावर पैसे जमा केले. माझा भाऊ तुषार मते यास फोन करून 30 लाख रुपये बँकेतून काढण्यास सांगितले.

आरोपी अजय शेळके याने माझी माणसे एका शोरुमसमोर उभे असून, त्यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे भावाने त्या दोघांकडे पैसे जमा केले. एवढे पैसे दिल्यानंतर तुझ्या खात्यावर किती पैसे आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर श्रीगोंदा येथील एटीएममध्ये जाऊन तीस हजार रुपये काढून ते वरील आरोपीकडे दिले. फिर्यादी मते यांना गाडीतून अहिल्यानगर येथे रात्री आठच्या सुमारास सोडण्यात आले. तेथून रिक्षा करून ते गावी परतले.

4 रोजी आरोपी अजय शेळके याने फिर्यादी मते यांना दूरध्वनी करून अहिल्यानगर येथे बोलावून घेतले. जीवे ठार मारण्याची धमकी देत पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावर मी दुसऱ्या दिवशी पैसे आणून देतो असे सांगितले व तेथून निघून गेलो. अजय शेळके याने वारंवार दूरध्वनी करून पैशांची मागणी करत होता.

घडलेला प्रकार भावाला सांगितल्याने त्याने धीर देत फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार वरील आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे करत आहेत.

आणखी आरोपी कोण?

अपहरण व खंडणी प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये तीन आरोपींची नावे समोर आली असली, तरी यामध्ये आणखी काही मंडळींचा सहभाग असल्याचे समजते. या मंडळींचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते की त्यांची सहीसलामत सुटका होते याकडे आता लक्ष लागले आहे.

आरोपीची उच्च पदस्थांसोबत ऊठबस

दरम्यान, अपहरण व खंडणी प्रकरणात आरोपी असलेला अजय शेळके याची जिल्ह्यातील काही राजकारणी मंडळी व शासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत ऊठबस असते. अनेक राजकारणी व अधिकारी यांच्यासोबत छायाचित्रे काढून तो सामाजिक माध्यमावर टाकत असल्याचे पहायला मिळत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT