शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्याील दक्षिण पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूर कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने सर्वच पिकांवर निराशेची ढग दाटून आल्याचे चित्र आहे.
सोयाबीन पीक येल्लो मोझॅक रोगाच्या विळख्यात सापडले असून खरिपाच्या सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच पाण्याच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे. मान्सून पूर्व तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर तालुक्यात 91 टक्के पेरण्या झाल्या आहेत. सुमारे 50 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मूग, सोयाबीन, बाजरी, तूर, उडीद, भाजीपाला पिके तसेच चारा पिकांची पेरणी करण्यात आली होती.
तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु पावसाने शेतकर्यांची निराशा केली. त्यातच येल्लो मोझॅक रोगाचा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादनाचा अंदाज फोल ठरणार आहे. सोयाबीनबरोबर मूग, उडीद, भाजीपाला पिकांवरही येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. काही प्रमाणात कपाशीवर देखील याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
बहुतांश भागात मुगाचे पीक काढणीला आले असून पाण्याच्या ताणामुळे मुगाच्या उत्पन्नात 60 ते 70 टक्के घट होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाण्याचा ताण, तसेच अळी व इतर रोगांचा प्रादुर्भावामुळे मुगाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. सोयाबीन, बाजरी पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. याचबरोबर खरिपातील जवळपास सर्वच पिकांवर अळी, करपा, मावा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. येल्लो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला असून शेंगा येण्याचे प्रमाण कमी राहणार आहे.
कांदा उत्पादनासाठी अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणार्या तालुक्यात लाल कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहेत. परंतु रोपांवर बुरशी, मर, करपा, डाऊनी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशी रोगामुळे रोपांची कलमे जळून जात आहेत. खरिपातील सर्वच पिकांची वाताहत झाली. बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच अद्याप तालुक्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे बंधारे, तलाव, नद्या, नाले, विहिरी कोरड्या ठाक आहेत. शेतकर्यांना जोरदार पावसाची आशा असून आगामी काळात होणार्या पावसावरच रब्बी पिकांचे देखील भवितव्य अवलंबून राहणार आहे.
येल्लो मोझॅक रोगाचा प्रसार मुख्यत्वे पांढरी माशी या कीटकामार्फत होतो. पिकांच्या पानावर पिवळसर चट्टे, डाग, जाळीदार डिझाईन दिसून येते. पाने आकुंचन पावतात. झाडांची वाढ खुंटते, शेंगांची संख्या कमी होते. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होत असते.
शेतकर्यांनी दरवर्षी एकच पीक न घेता पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. तसेच रासायनिक खतांचा अतिरेक वापर टाळून जैविक शेतीकडे वळण्याची गरज आहे. रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर उच्च प्रतीचे बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी तज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी. -संदीप काळे, कृषीतज्ज्ञ तथा साईनाथ कृषी उद्योग