संदीप रोडे
गत पंचवार्षिकला काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऐनवेळी भाजपात गेले होते. त्यामुळे काँग्रेसची फजिती झाली होती. गत लोकसभेच्या तोंडावर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीवेळी डॉ. सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. त्या वेळी त्यांना उमेदवार देण्यासाठी धावपळ करावी लागली होती. आता विखे पाटील भाजपात आहेत, तर कोतकर-जगताप सख्खे नातलग. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत राजकीय दिशा बदलाचे संकेत दिले जात आहेत. उबाठा सेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले दिलीप सातपुते यांच्यावरच ‘बाणा’ची दिशा ठरणार आहे. दिलीप किंवा त्यांचे चिरंजीव ओंकार सातपुते वगळता इतर नावांची चर्चा शिवसेनेकडून फारशी होताना दिसत नाही. उबाठा सेनेचा ‘संग्राम’ कोतकर सोडले तर उमेदवार शोधतानाच दमछाक होण्याची चिन्हे आहेत. त्याउलट भानुदास कोतकर व संग्राम जगताप यांच्याकडे मात्र इच्छुकांची संख्या लक्षणीय दिसते. (Latest Ahilyanagar News)
प्रदीर्घ काळानंतर भानुदास कोतकर केडगावात सक्रिय झाले आहेत. बहुतांश माजी नगरसेवक त्यांच्यासोबत नसले तरी त्यांनी नवतरुणांची मोट बांधली असल्याचे दिसते. पोळा, दहिहंडी व गणेशोत्सवाची धूम पाहता केडगावात नवीन राजकीय समीकरण उदयास येते की काय? अशी चर्चा आहे. गणेश सातपुते, सागर सातपुते, भूषण गुंड, महेश सरोदे सारखे नवीन चेहरे भानुदास कोतकरांनी हेरल्याचे दिसते. माजी नगरसेवक सुनीलमामा कोतकर, सुनील सर्जेराव कोतकर हे आ. संग्राम जगताप यांच्यासोबत आहेत.
महेश़ गुंड, सूरज कोतकरसारखे कार्यकर्तेही आ. जगताप यांच्याकडे आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांच्या साथीमुळे आ. जगताप यांची ताकद केडगावात वाढली असल्याचे चित्र एकीकडे तर दुसरीकडे भानुदास कोतकर यांचे सक्रियता पाहता राजकीय समीकरणे बदलाचे संकेत दिले जातात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना जी पार्श्वभूमी असते, ती स्थानिक राजकारणात नसते, ही त्या बदलामागील पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे.
गत पंचवार्षिकला 17 नंबर वार्डात असलेले भूषणनगर, आंबिकानगर आता 16 नंबर वार्डाला जोडले आहेत. गतवेळी केडगाव गावठाणची दोन वार्डात विभागणी होती, पण आता संपूर्ण गाव एकाच 16 नंबर वार्डात समाविष्ट करण्यात आले आहे. रंभाजीनगर, अयोध्यानगर आणि लिंक रोडचा परिसर 15 नंबर वार्डाला जोडला गेला आहे. नवीन प्रारून रचनेत 16 नंबर वार्डाची व्याप्ती पाहता प्युअर केडगावकरांचा प्रभाग झाला आहे. त्यामुळे येथून मूळ केडगावकरांना संधी मिळेल असे चित्र आहे. केडगावात ज्यांचे राजकीय वजन जास्त त्यांच्यासाठी हा सोप्पा वार्ड झाल्याचे दिसते. त्यामुळेच भानुदास कोतकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
भाजपकडून सुजय
भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे चिरंजीव सुजय मोहिते हे याच वार्डातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. केडगावचे_ राजकारण आणि गत पंचवार्षिकचा खेळ पाहता येथे पक्षीय राजकारण फारसे चालत नाही, स्थानिक राजकारणांचे आडाखे येथे महत्त्वाचे मानले जातात, असे दिसते. भानुदास कोतकर, आ. संग्राम जगताप, दिलीप सातपुते यांच्याभोवतीच या वार्डाचे राजकारण फिरणार असले तरी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असेल,असे दिसते.
केडगाव अन् कोतकर समीकरणाचे काय?
काँग्रेसचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावात नवीन चेहरे शोधून त्यांना पुढे आणण्याची तयारी चालविली असल्याचे चित्र आहे. यापूर्वी़़ कोतकरांच्या कुटुंबातील कोणीएक उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत असायचा, यंदा मात्र तो असेल की नाही याची उत्सुकता आहे. केडगाव आणि कोतकर हे राजकीय समीकरण गत अनेक वर्षापासूनचे आहे. यंदा ते समीकरण कायम राहणार की बदल होणार हे येणार्या काळात समजेल. तोपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी केडगाव आणि कोतकर यांच्या राजकीय भूमिकेची उत्सुकता असणार आहे.