Rashin flag controversy
कर्जत: तालुक्यातील राशीन येथील झेंडा प्रकरणाचे पडसाद सलग दुसर्या दिवशी कर्जतमध्ये उमटले. या घटनेच्या संदर्भात प्रशासनाने लाठीमार करून युवकांवर गुन्हे नोंदवले, त्याचा निषेध करण्यासाठी व नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळवारी कर्जत शहर बंदची हाक दिली होती. त्यानुसार कर्जतमध्ये आज संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार पूर्ण ठप्प होते.
राशीन येथील क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले चौक या परिसरामध्ये रविवारी रात्री भगवा झेंडा लावण्यात आला व छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या चौकाला देण्याबाबत समाजमाध्यमावर स्टेटस ठेवण्यात आले होते. (Latest Ahilyanagar News)
यामुळे मोठा जमाव त्या ठिकाणी जमला, दरम्यान, पोलिस त्या ठिकाणी आले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी लाठीमार केला आणि याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिसांनी राशीन येथे बळाचा वापर करत कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीमार केला.तसेच काही युवकांवर दगडफेक केल्याचे खोटे गुन्हे दाखल केले; दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचे व वाढवण्याचे काम पोलिस प्रशासनाने केले, असे आरोप करत निषेध करण्यासाठी, मराठा समाजाच्या युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी कर्जत शहर बंद ठेवण्याची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या संख्येने युवक आज सकाळी एकत्र आले. आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन नोंदवलेली गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व पोलिसांनी केलेल्या लाठीमार व कारवाईची चौकशी करून संबंधित अधिकार्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.