संगमनेर : आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात जोर्वे ग्रामपंचायतीने सोमवारी (दि.3) आयोजित केलेली विशेष ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. थोरात गटाने नियोजीत आश्वी अप्पर तहसील कार्यालयास विरोधाचा ठराव मांडला, तर विखे गटाने आश्वी नको, आता जोर्वेतच अप्पर तहसील कार्यालय करावे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, जोर्वे हे माजी मंत्री थोरातांचे गाव असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या या भूमिकेने या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
जोर्वे येथील पारावर सोमवारी सकाळी 10 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आश्वी बुद्रुक प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय हा ग्रामसभेतील चर्चेचा विषय होता. सभा सुरू झाल्यानंतर थोरात समर्थकांनी अप्पर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडला. यावेळी थोरात-विखे गटात जोरदार घोषणाबाजी व शाब्दिक बाचाबाची झाली.
यावेळी संगमनेर शहर जोर्वेपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्व सुविधांचे कार्यालय एकाच ठिकाणी आहे. फक्त राजकारणासाठी काही मंडळी ‘आश्वी’चे समर्थन करत आहे. हे कितपत योग्य आहे, असा सवाल उपसरपंच बादशहा बोरकर यांनी विचारला. यावर ग्रामस्थांनी एकमताने ठराव करत आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयाला कडाडून विरोध केला, तर ग्रामसेवक बाजीराव पवार यांनी हात वर करून मतदान घेत ठराव मंजूर केल्याचे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे
ग्रामसभेत विखे समर्थक देखील प्रचंड आक्रमक दिसले. त्यांनीही अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावाला विरोध करणार्या थोरात गटाच्या निषेधाची घोषणाबाजी केली.
दरम्यान, एकीकडे जोर्वेतील काही ग्रामस्थांनी आश्वी प्रस्तावित कार्यालयाला कडाडून विरोध दर्शविला असताना, दुसरीकडे येथीलच काही ग्रामस्थांनी अप्पर तहसील कार्यालयाला सहमती दर्शवितानाच, आता आश्वी येथे हे कार्यालय न करता मध्यवर्ती ठिकाण म्हणून जोर्वेतच ते करावे, अशी मागणी केली. त्यासाठी संगमनेर तालुक्यात एकूण 174 गावे आहेत. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी नक्कीच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यावश्यक असल्याचेही मते मांडली. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय होणेबाबत मोठ्या आवाजात ठराव मांडण्यात आल्याचे विखे समर्थकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मतदारसंघाची फेररचना करताना जोर्वे गावाचा समावेश हा शिर्डी मतदार संघात करण्यात आला. त्यावेळी तालुक्याच्या माजी आमदारांनी का विरोध दर्शविला नाही, त्यावेळी तालुका विभागला जात नव्हता का ? आजच का तुम्हाला जोर्वे गाव व तालुक्याचा पुळका आला आहे. कनोली, मनोली, कनकापुर, दाढ, चणेगाव, शिबलापूर ह्या गावांचा माजी आमदारांना पोटशूळ का? सर्वसामान्यांची महसुलशी निगडित असलेली शेती शिवार रस्ते, शेती वादातील सुनावण्या, शिधापत्रिका, निराधार योजना अशी विविध कामे वेळेत व गतीने पूर्ण होणार आहेत हे तुम्हाला बघवत नाही का ? माझे व ग्रामस्थांचे असे मत आहे की संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे वगळून प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय हे होणे आवश्यकच आहे. यामुळे आश्वी, उंबरी, पानोडी, ओझर, झरेकठी, शेडगाव, शिबलापूर, कनकापूर, चिंचपुर,इ गावांना न्याय मिळेल आणि शक्य असल्यास प्रशासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी जोर्वेचाच विचार करावा, अशी मागणी आम्ही सर्व ग्रामस्थ पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत, असे जोर्वेचे विखे गटाचे गोकुळ दिघे यांनी स्पष्ट केले.
आश्वी बुद्रुक येथील नियोजित अप्पर तहसील कार्यालयाला 42 गावांनी ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध केला आहे. अन्यायकारक हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा या मागणीसाठी तहसीलदार कार्यालय येथे सोमवारी ( दि.3) विविध गावांमधील नागरिक व अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब राहणे, उपाध्यक्ष अरुण गुंजाळ, सचिव रामेश्वर पानसरे व सर्व गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन नायब तहसीलदार गिरी यांनी स्वीकारले. यावेळी संगमनेर बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर आश्वी बुद्रुक व परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी येथील अप्पर तहसील कार्यालय तातडीने सुरू करावे, यासाठी मागणीसाठी आश्वी व परिसरातील नागरिक व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक एकत्र येत सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब जर्हाड, मच्छिंद्र शेटे, सुरेश धुमाळ, रविंद्र शेळके, कैलास तांबे, ज्ञानदेव लोखंडे, अॅड.रोहीणी निघुते आदिंसह नागरिक उपस्थित होते.