रोडरोमिओंविरोधात जेऊरचे तरुण आक्रमक! विद्यालय परिसरात गस्त घालण्याचा निर्णय Pudhari
अहिल्यानगर

Jeur News: रोडरोमिओंविरोधात जेऊरचे तरुण आक्रमक! विद्यालय परिसरात गस्त घालण्याचा निर्णय

तरुणांच्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा वाढता उपद्रव लक्षात घेता, गावातील तरुणांनी एकत्र येत टपरींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालय परिसरातील रस्त्यांवर गस्त घालून विद्यार्थिनींच्या रक्षणासाठी तरुण एकवटणार आहेत. तरुणांच्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

जेऊर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. विद्यालय परिसरांमध्ये घोंगावणार्‍या टपोरी मुलांकडून मुलींची छेडछाड, पाठलाग करणे, अश्लील हावभाव, धूमस्टाईल गाडी चालविणे, कट मारणे, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. विद्यालय परिसर, तसेच विद्यालयाला जोडणारे रस्ते रोडरोमिओंच्या विळख्यात सापडले आहेत. घोळक्याने दारूच्या नशेत तुर्रर्र असणार्‍या टपोरींची दहशत वाढली आहे.  (Latest Ahilyanagar News)

यापूर्वी शाळेतील शिक्षकांना अरेरावी, तसेच रोडरोमीओमध्ये आपापसात हाणामारी, असे प्रकार घडले आहेत. जेऊर येथे माध्यमिक शिक्षणासाठी ससेवाडी, बहिरवाडी, चापेवाडी, आढाववाडी, वाघवाडी, तोडमलवाडी, धनगरवाडी, इमामपूर तसेच विविध वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. बहुतांशी विद्यार्थिनी पायी अथवा सायकल वरून विद्यालयात येतात. अशा विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, टॉन्ट मारणे, छेडछाड, कट मारणे असे प्रकार घडत आहेत. परंतु शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी विद्यार्थिनी हा प्रकार पालकांना अथवा शिक्षकांना सांगत नाहीत.

शाळा-महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस रोड रोमिओंचा गराडा परिसरात असतो. गावामध्ये खासगी क्लास घेणार्‍यांची संख्या देखील जास्त आहे. खासगी क्लासेसच्या परिसरात रोडरोमिओ घोंगावत असतात. रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे पालकांना आपले काम सोडून विद्यार्थिनींना शाळेत ने-आण करावी लागत आहे.

रोडरोमीओच्या वाढत्या उपद्रवामुळे तरुणांनी एकत्र येत त्यांना चांगलाच धडा शिकविण्याची भूमिका घेतली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांनीही याबाबत पुढाकार घेतला असून गावात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आमच्या बहिणींची तसेच मुलींच्या रक्षणासाठी आम्ही समर्थ असल्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. रोडरोमिओना धडा शिकविण्यासाठी महाविद्यालय परिसर व विद्यार्थिनींच्या रस्त्यांवर गस्त घालून रोडरोमिओना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे.

पालक-शिक्षकांना माहिती द्या

विद्यार्थिनींनी न घाबरता टपोरी मुलांकडून पाठलाग, छेडछाड होत असल्यास त्याची कल्पना पालक अथवा शिक्षकांना द्यावी. त्रास देणार्‍या रोड रोमीओंच्या दहशतीला न जुमानता विद्यार्थिनी व पालकांनी समोर यावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका तरुण वर्गाने घेतली आहे.

पोलिसांनी खंबीर भूमिका घ्यावी!

रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी खंबीर भूमिका घ्यावी. विद्यालय, तसेच विद्यालय परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस पोलिसांनी गस्त घालून रोड रोमिओंवर कारवाई करावी. त्यासाठी गावातील तरुण सहकार्य करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT