बोधेगाव: मराठवाड्यासह नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या जायकवाडी जलाशयात गुरुवारी रात्री 102.1846 टीएमसी म्हणजे 99.48 टक्के पाणीसाठा झाला. उपयुक्त पाणीसाठा 76 हजार 1184 टीएमसी म्हणजे 99.28 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याने धरण प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात तिसर्यांदा पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जलाशयाच्या दरवाजा क्रमांक 10 ते 27 असे एकूण 18 दरवाजांमधून चार फुटापंर्यंत उघडून 75 हजार 456 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती धरण प्रशासनाकडून सांगण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
सध्या जायकवाडी सागर जलाशयात नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून 12 हजार 620 क्यूसेसने पाण्याची आवक सुरू आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी या परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे . त्यामुळे जलाशयात पाण्याची आवक जोरदार होत आहे.
गेल्या 24 तासांत जलाशयात 4.8289 क्यूसेक नवीन पाण्याची आवक झाली असून यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत 80.2110 क्यूसेक नवीन पाणी दाखल झाले असून, शुक्रवारी सकाळी जलाशयाचा एकूण पाणीसाठा 99.47 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याने धरण प्रशासनाने जलाशयातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे 75 हजार 456 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आता जलाशयात नवीन पाण्याची आवक बघून विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल, असेही धरण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. गोदावरी नदीकाठच्या जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.