नगर: नाशिक, नगर जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी व प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या नद्यांतून जायकवाडी धरणात गेल्या 38 दिवसांत 25.5 टीएमसी पाणी पोहोचले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठी मंगळवारी सायंकाळी 46.54 टीएमसीवर पोहचला होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 43.43 टीएमसी अधिकचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याची वेळ येणार नाही, अशी परिस्थिती दिसत आहे. (Latest Ahilyanagar News)
मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत जून महिन्यात म्हणावा अशा दमदार पावसाची नोंद झालेली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांत जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत आहे.
भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. चार-पाच दिवसांपासूनच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणांतून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे ही नदी देखील दुथडी वाहू लागली आहे.
त्यामुळे मंगळवारी (दि.8) सकाळी 8 वाजता जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 43.92 टीएमसी नोंदविला गेला आहे. या धरणात 1 जून ते 8 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत 22.58 टीएमसी पाणी पोहोचले. मंगळवारी दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 2.62 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात 46.54 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणात फक्त 3.11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र 8 जुलैपर्यत या धरणात 43.43 टीएमसी अधिकचा साठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातून मंगळवारी सहा वाजता 53 हजार 334 क्यूसेकचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू होता.