Jamkhed Encroachment Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Encroachment: अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तू-तू, मैं-मैं...

जामखेडमध्ये तिसऱ्या दिवशी बाजार समितीचे गाळे जमीनदोस्त;

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवारी (दि. ८) पुन्हा वेग आला असून, प्रशासनाच्या पथकाने दिवसभर विविध भागांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. बुधवारी (दि. ७) काही काळ थांबलेली मोहीम गुरुवार सकाळपासून पुन्हा सुरू झाल्याने अनेक दुकाने, पत्र्याचे शेड आणि व्यावसायिक बांधकामे बुलडोझरच्या साह्याने हटविण्यात आली.

बाजार समिती परिसरातील काही गाळ्यांवरही कारवाई करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी जागेच्या हद्दीवरून नागरिक आणि संबंधितांमध्ये तू-तू, मैं-मैं होताना दिसून आली. अतिक्रमणाची हद्द नेमकी कुठपर्यंत आहे, यावरून काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यामुळे कारवाईपूर्वी जागेची हद्द स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अतिक्रमण हटविताना कटर मशीनऐवजी मोठ्या ब्रेकरचा वापर होत असल्याने लगतच्या घरांना तडे जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोठ्या ब्रेकरमुळे होणाऱ्या कंपनामुळे शेजारील बांधकामांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व अतिक्रमणे हटविल्यानंतर कटर मशीन आणणार का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

कारवाईमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले असून, त्यांच्या व्यवसायाचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी बांधकामे पाडताना लगतच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी योग्य यंत्रसामग्रीचा वापर करण्याची मागणी होत आहे.

अतिक्रमण असेल तर कारवाई झालीच पाहिजे; मात्र कारवाई करताना मूळ जागेची हद्द स्पष्ट करून शेजारील घरांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. नियम सर्वांसाठी समान असावेत. अतिक्रमण हटाव मोहिमेची पुढील दिशा आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारींवर काय कार्यवाही केली जाते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.
- एक नागरिक
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला विरोध नाही. मात्र, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. कुणालाही सूट देऊ नये आणि कुणाचीही जास्त जागा अधिग्रहित करू नये. प्रशासनाने नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी.
- ऋषिकेश खरात, युवा नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT