शिर्डी: शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक तथा प्रगतशील शेतकरी दत्तात्रय गोंदकर (वय 54, रा. शुभम निवास, शिवाजीनगर, शिर्डी) यांचा 6 मार्च रोजी झालेला मृत्यू त्यांचा मुलगा शुभम (वय 29) याने केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आईशी झटापट करत असल्याने शुभमने आपल्या वडिलांना मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी शुभम (वय 29) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला सोमवारी (दि. 10) अटक केली. राहाता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 6 मार्च रोजी दत्तात्रेय गोंदकर यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. नंतर 7 मार्च रोजी दत्तात्रय गोंदकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान, सोमवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात गोंदकर यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे आणि त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी शुभम यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत शुभमने वडिलांना मारहाण केल्याचे कबूल केले.
आपल्या आईशी वडील झटापट करत होते, त्या वेळी राग आल्याने वडिलांना फायबरच्या पाईपने मारहाण केल्याचे व त्यांना भिंतीवर ढकलून दिल्याचे शुभमने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा शुभम गोंदकरला पोलिसांनी अटक केली.
पोलिस निरीक्षक निवांत जगजितसिंग जाधव (वय 40) यांनी याबाबत फिर्याद दिली. शुभमला मंगळवारी राहाता न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कांयदे यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमणे, निरीक्षक रणजित गंलाडे व पथकाने घटनास्थळी पाहणी केली होती. गोंदकर यांच्या मृत्यूनंतर शिर्डी आणि परिसरात सोशल मीडियावर विविध शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या.