Indian Army War Exercise
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील लष्कराच्या केके रेंज या सराव भूमीवर 'आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल'च्या वतीने एका भव्य युद्ध सराव प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या युद्ध सरावादरम्यान धुरांचे लोट, अत्याधुनिक रणगाड्यांची हालचाल आणि तोफांचा कानठळ्या बसवणारा आवाज असा थरार पाहायला मिळाला.
भारतीय सैन्याच्या जवानांनी शत्रूवर कशा प्रकारे चाल करून जाता येते, याचे थेट सादरीकरण केले. यामध्ये तोफांचा मारा, गोळीबार आणि मिसाईल्सचा वापर करण्यात आला. तसेच ड्रोनच्या साहाय्याने आणि विमानातून झेप घेऊन शत्रूवर हल्ला करण्याची तंत्रेही दाखवण्यात आली.
या युद्धभूमीवरील थरारात प्रामुख्याने भीष्म (T-90), अजय आणि टी-७२ यांसारख्या शक्तिशाली रणगाड्यांच्या कामगिरीचा अनुभव घेता आला. हा सराव सुमारे दोन तास चालला आणि तो निमंत्रित मित्र राष्ट्रांच्या सैन्यासमोर सादर करण्यात आला. भारतीय लष्कराची प्रशिक्षण संस्था असलेल्या 'आर्मड कॉर्प्स स्कूल अँड सेंटर'च्या वतीने हा संपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता. या युद्ध सरावाच्या माध्यमातून भारतीय लष्कराने आपली ताकद आणि सज्जता जगासमोर मांडली आहे.