संगमनेर : सासरी निघून गेलेल्या पत्नी, सासरे, मेव्हणे, चुलत सासरे यांनी वेळोवेळी अपमान करून मारहाण केली. यामुळे तणावग्रस्त असलेल्या पतीने राजापूर येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत्यू पूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीवरून शहर पोलिसात पत्नीसह सासरे व इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
वैभव याचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते.लग्नानंतर माधुरी व वैभव हे दोघे लक्ष्मीनगर येथे विभक्त राहण्यास आले. सुकेवाडी रोड, घुलेवाडी येथे रुम बदलले. यावेळी वारंवार होणारे वाद तो वडिलांना सांगत होता. नवरा बायकोतील वाढलेल्या वादामुळे माधुरी ही माहेरी एप्रिल महिन्यात निघुन गेली. तिने भरोसा सेल येथे कुटुंबाविरोधात तक्रार केली.
तिच्या त्रासाला कंटाळुन वैभव हा परत राजापुर येथे घरी राहण्यास आला. वैभव व वडिलांचे साडू बादशाह गणपत चौधरी दोघेही माधुरीला नांदविण्यासाठी एक महिन्यापुर्वी गेले होते.माधुरी व तिचे वडील शिवाजी वाडेकर, चुलते बाळासाहेब वाडेकर, मेव्हणा तुषार वाडेकर यांनी शिवागाळ करुन व मारहाण करुन वैभव यांस तु जगु नकोस आत्महत्या कर असे बोलुन तेथुन काढुन दिले. त्यानंतर तो सतत तणावाखाली होता. दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता वडील गावात डेअरीत दूध टाकण्यासाठी गेले असता वैभव याने त्याच्या खोलीतील सिलींग फॅनला मफलरने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, दहाव्याच्या इतर विधीसाठी घरातील खोल्या आवरत असताना वैभव याने लिहुन ठेवलेली चिठ्ठी सापडली. वैभवच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याची पत्नी माधुरी वैभव हासे, सासरे शिवाजी तुकाराम वाडेकर, चुलत सासरे बाळासाहेब तुकाराम वाडेकर, मेव्हणा तुषार शिवाजी वाडेकर यांच्यावर वैभवला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अनिल मोरे हे करत आहे.