मानद पदवी प्रदान Pudhari
अहिल्यानगर

मंत्री विखे यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान

राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

लोणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देवून, राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

यावेळी कृषी मंत्री, प्रकुलपती माणिकराव कोकाटे, मंत्री मेघना बोर्डीकर, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, कुलगुरू डॉ. इंद्र मणी, केंद्रीय मूल्य आयोगाचे पाशा पटेल आदी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाने केलेल्या सन्मानाबद्दल मंत्री विखे पाटील म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्यामुळे राज्याला कृषी विद्यापीठाची देण मिळाली. त्यांच्या नावाने विकसित झालेल्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने केलेला सन्मान हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेले संशोधन महत्वपूर्ण आहेच, पण भविष्याची गरज लक्षात घेवून आपल्या संशोधनाची दिशा आता बदलावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी विद्यापीठांना काम करावे लागणार आहे असे सांगत, विषमुक्त शेती निर्माण करण्याचे आव्हान आता सर्वांना स्विकारावे लागणार आहे, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

बांबू शेतीसंदर्भात पाशा पटेल यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, येणार्‍या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकराचे आहे. यासाठी कराव्या लागणार्‍या कामासाठी आजचा सन्मान पाठबळ देणारा ठरेल, अशी भावना मंत्री त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या या सन्मानाबद्दल माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन, आमदार शिवाजीराव कर्डील, आमदार विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा. चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बँकेचे चेअरमन भास्कर खर्डे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, भाजपाचे कार्याध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सन्मान तमाम शेतकर्‍यांना समर्पित!

आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देवून केलेला सन्मान खूप मोठा आहे. हा सन्मान राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT