केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान Pudhari
अहिल्यानगर

कृषी उत्पादन वाढविण्यास सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

पुढारी वृत्तसेवा

शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

बाभळेश्वर (ता. राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे कृषी प्रदर्शन व शेतकरी परिसंवादात चौहान यांनी संवाद साधला. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील आदी उपस्थित होते.

आपल्याला परंपरागत शेतीकडून आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार आहे, असे नमूद करून चौहान म्हणाले, की या वर्षी 300 नवीन बीज वाणांचे संशोधन करण्यात आले आहे. खतांवरील अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र शासनाने शेतकरी हिताचे काही निर्णय घेतले. त्यानुसार शेतकर्‍यांना डीएपी खतांची 50 किलोची पिशवी 1350 रुपयात दिली जाईल. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत पंचनामा करताना आता ‘गाव’ हा घटक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात येऊन शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास उशीर केल्यास 12 टक्के व्याजासह शेतकर्‍यांना भरपाई देतील. शेतकर्‍यांच्या पीक नुकसानीचा पंचनामा आता सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगद्वारे केला जाणार आहे. यासाठी 852 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 69 हजार कोटी रुपये पीक नुकसान भरपाईसाठी संरक्षित ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे गौरवोद्गार काढून मंत्री चौहान म्हणाले, की आता यापुढे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करून लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशात 3 कोटी लखपती दीदी निर्माण करायच्या आहेत. महाराष्ट्रात प्रत्येकाला पक्के घर मिळावे यासाठी आता प्रधानमंत्री आवास योजनेत 13 लाख 29 हजार नवीन घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी अटी व शर्तीत शिथीलता आणण्यात आली आहे, असेही चौहान यांनी सांगितले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की शासनाने महिलांसोबत शेतकरी, युवक आणि लाडक्या भावांसाठीही लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाचे राज्य शासनाला पाठबळ मिळत आहे. कृषी विज्ञान केंद्रात येत असलेल्या नवीन कृषी तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी कासार, मोनिका भालेराव, अश्विनी कोळपकर, कमल रोहकले, सुनीता ओहळ, सुनीता लांडे, स्वाती गागरे, कल्पना शिंदे, संगीता भागवत व मंगल खेमनर यांचा प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यशवंत शेतकरी बाबासाहेब गोरे, आशाताई दंडवते, सुभाष गडगे, गणेश अंत्रे, नवनाथ उकिर्डे व मोहन तुंवर यांचा केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण आणि एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गतचे लाभार्थी शेतकरी पंकजा दळे, जयश्री निर्मळ, भागवत जाधव व अमोल कासार यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टरवाटप करण्यात आले.

कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकरी व महिला बचत गट सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी प्रास्ताविक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT