कर्जत : तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी कर्जत पंचायत समितीसमोर हलगी बजाव व ठिय्या आंदोलन केले.
मिरजगावयेथील व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक 23 चा लिलाव न करता तो एका शासकीय कार्यालयाला भाड्याने देण्यात आला. आठवडे बाजारात गाळे बांधण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली. ती रद्द केली. माझी वसुंधरा योजनेत कोणती विकासकामे केली, याची माहिती वारंवार मागवूनही दिली जात नाही. पंचायत समितीकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार अर्ज दिला असताना त्याची चौकशी का करण्यात आली नाही, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सागर पवळ, अमोल माने ,अंजूम आतार, सुनील गायकवाड, संजय गदादे, ईश्वर माने ,सलीम आतार, संग्राम घोडके, अमृत लिंगडे, पंढरीनाथ गोरे,रूषी माने, ,डॉ. चंद्रकांत कोरडे, प्रकाश चेडे, गुलाब तनपुरे, संदीप गदादे, दादा रासकर, गौतम रासकर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते.
मिरजगाव ग्रामपंचायतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सदस्य माने यांनी केला. विस्तार अधिकारी आटकोरे यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी गटविकास अधिकार्यांना दिलेला अहवाल व त्याच्या प्रती पुरावा म्हणून पत्रकारांना दिल्या.
माने म्हणाले, विस्तार अधिकार्यांच्या अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की , मिरजगाव ग्राम पंचायतीला भेट दिली असता,उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून गेल्या सभेच्या इतिवृत्ताची व 15 फेब्रुवारी 2021 मूळ इतिवृत्त नोंदीची पडताळणी केली असता, तक्रारदारांनी सादर केलेल्या इतिवृत्तात एकूण असलेले ठराव व मूळ इतिवृत्तात असलेले ठराव यात दोन ठरावांचा फरक दिसून येत आहे. यात ग्रामपंचायतीची खरेदी व दिलेली रक्कम अवगत होत नाही. यासह इतरही इतर बाबींचा उल्लेख अहवालात केला असून, 16 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या अहवालावर कार्यवाही करावी, अशी मागणी माने यांनी केली.
माजी उपसरपंच अमृत लिंगडे म्हणाले, विकास कामाच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार सुरू आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे कोणतेही काम केले जात नाही. तसे पुरावे गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. याबाबत संबंधितांवर तत्काळ कार्यवाही करावी, यासाठी बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गोरे व सलीम आतार यांनीही जोरदार टीका केली.