शिर्डी: संघटनेच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबूत करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करुन देण्याचा संकल्प आधिवेशनात केला जाईल. महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिली, आता नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी ताकद उभी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिर्डी येथील भाजप प्रदेश आधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत आधिवेशनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रामुख्याने स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उल्लेख करताना महायुती म्हणूनच या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे ते म्हणाले.
शिर्डीतील अधिवेशन ऐतिहासिक आहे. विधानसभा निवडणूकीत जनतेने फडणवीस सरकार निवडून दिले. 237 संख्याबळ असलेले हे सरकार निवडणून दिल्या बद्दल जनतेचे आम्ही आभार मानणार आहोत. कार्यकर्त्यांनेही या विजयात मोठे योगदान दिले, त्यांचेही आभार व्यक्त केले पाहीजे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मानही केला पाहीजे यासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे. अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मार्गदर्शन होणार असून, मंत्री आशिष शेलार हे अभिनंदनाचा ठराव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संघटन मजबूत करुन दिड कोटी सदस्य संख्या आम्ही गाठणार असल्याचे ते म्हणाले. महायुती म्हणून निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पैसा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी संघटन आणि समाज मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजप सर्व समाज घटकांना बरोबर घेवूनच पुढे जात असल्याचे बानकुळे यांनी सांगितले.
भाजपने श्रध्दा आणि सबुरीचा संदेश स्विकारुनच आपली वाटचाल केली आहे. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही, मात्र यापुर्वी जनाधार डावलून उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. त्यांच्या विजयाच्या रॅलीत पाकीस्तानचे झेंडे दिसले. आता काही गोष्टी त्यांच्या उशिरा लक्षात आल्या आहेत. अशी परिस्थिती असली तरी, महाराष्ट्राचे राजकारण हे संस्कृती आणि संस्कार पाळून पुढे जाते, मनात कटूता ठेवून चालत नाही.