मढी : यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्यासाठी घेतलेली मढीची ग्रामसभाच पंचायत समिती प्रशासनाने नियमबाह्य ठरविली आहे. मुंबई ग्रामपंचायत नियम 1959 मधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान मंत्री नितेश राणे हे मढीत येत असून त्यांच्या उपस्थित सभा होणार असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पंचायत समितीने ग्रामसभेसंदर्भाच चौकशी केल्यानंतर तसा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठविला आहे. अहवालात सरपंच अथवा ग्रामसेवकांवर कसलीही कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली नाही. ग्रामसभा नियमबाह्य ठरविली गेल्याने तो ठराव अपोआपच संपुष्टात आल्याचे समजून नेहमीच्या व्यापार्यांना दुकाने लावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शनिवारी (दि.22) सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली मढीची ग्रामसभा झाली. त्यात घरकुल योजनेचा विषय होता. याच सभेत ऐन वेळेच्या विषयात यात्रेचा विषय घेऊन प्रथा परंपरा पाळल्या जात नसल्याने मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय बंदीचा ठराव घेण्यात आला. त्यावर राज्यभर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. विविध कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करत ग्रामसभेच्या निर्णयाला विरोध दर्शविला. हिंदुत्ववादी संघटना आणि ठराविक ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागतही केले होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत पंधरा दिवस चालणार्या यात्रेत राज्यातून लाखो भाविक येतात. अचानक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महसूल, पोलिस आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीची पावले उचलत कोणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही, याची दक्षता पंचायत समिती प्रशासनाने घेतली. गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेत ती ग्रामसभाच रद्दची मागणी केली होती. मढीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना अहवाल दिला असून त्याची प्रत वरिष्ठांना देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी कांबळे यांनी सांगितले. शमाअली जाफर पठाण यांच्या तक्रार अर्जावरून ग्रामविकास अधिकार्याला कारणे दाखवा नोटीस दिल्याचा मुद्दाही अहवालात विचारात घेतल्याने सूत्रांनी सांगितले. .