पाथर्डी : शहरातील मणिकदौंडी चौकात मंगळवारी मध्यरात्री सरकारी कॉन्ट्रॅक्टर अजिंक्यराजे गर्जे (रा. पाथर्डी) यांना पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागातील सरकारी कर्मचारी श्रीकांत पालवे (रा. धामणगाव देवी रोड, पाथर्डी) आणि प्रतीक बढे (रा. नाथनगर, पाथर्डी) यांनी टक्केवारीसाठी मारहाण करत धमकी दिली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Ahilyanagar News)
याबाबत मिळालेली माहिती अशी ः मंगळवारी (7 ऑक्टोबर) रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास श्रीकांतने दारूच्या नशेत अजिंक्यराजे यांना फोन करून टक्केवारी मागितली आणि माणिकदौंडी चौकात बोलावले. तिथे श्रीकांत आणि प्रतीक यांनी गाडीतून उतरून अजिंक्यराजे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, तोंडावर आणि हातावर जखमा झाल्या. यात त्यांची दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी गहाळ झाली. दोघांनी ‘पुन्हा नादी लागलास तर जीवे मारू; अशी धमकी देऊन पळ काढला. अजिंक्यराजे गर्जे यांच्या या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.