कोळपेवाडी: राज्यभरातून आलेल्या बचत गटांच्या महिलांनी गोदाकाठ महोत्सवात विक्रीस ठेवलेल्या घरगुती उत्पादने खरेदीसाठी कोपरगावकरांनी पहिल्या दिवसापासूनचं भरघोस प्रतिसाद दिला. अवघ्या चार दिवसांत तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली, अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली.
पुष्पाताई काळे म्हणाल्या की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे कौतुक करावे तेवढे कमीचं आहे. महिला स्वयंपूर्ण झाल्यास कुटुंबाचा आर्थिक पाया मजबूत होतो. समाजाचा त्यातून सर्वांगीण विकास साध्य होतो. महिलांच्या कौशल्यांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गोदाकाठ महोत्सव स्वरुपात मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासह त्यांचे कौशले व उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या गोदाकाठ महोत्सवात कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील महिला बचत गट, महिला उद्योजिका, गृहोद्योजक महिला व स्वयंरोजगारावर आधारित व्यवसायिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, असे त्यांनी सांगितले. पुष्पाताई काळे व चैताली काळे यांनी या उपक्रमासाठी केलेल्या मार्गदर्शनासह योग्य नियोजनामुळे महोत्सव यशस्वी ठरला. गोदाकाठ महोत्सवात समता रक्त पेढी संगमनेरच्या वतीने रक्तदान शिबीर पार पडले. रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
‘बचत गटांच्या महिलांनी कर्तृत्व, कौशल्य व स्वाभिमान सिद्ध केला आहे. घरगुती उत्पादन, खाद्य पदार्थ, हस्तकला, शेतीपूरक वस्तूंच्या उत्पादनालाचं नव्हे तर, महिलांच्या कष्टांना गोदाकाठ महोत्सवातून हक्काची बाजारपेठ मिळाली. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या महोत्सवाचे खरे यश उलाढालीच्या आर्थिक आकड्यांमध्ये नव्हे तर, महिलांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आत्मविश्वासात दडले आहे. गोदाकाठ महोत्सवातून महिलांच्या कष्टांना मिळालेला सन्मान व त्यांच्या स्वप्नांना मिळालेले महकाय आकाश ठरले आहे. ही केवळ बाजारपेठचं नव्हे, तर महिलांच्या आत्मसन्मानाचा अनोखा उत्सव आहे. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व स्थानिक उद्योजकतेला बळ देणारा हा उत्सव पुढील काळातही अधिक प्रभावीपणे असाच सुरु ठेवणार आहे.आमदार आशुतोष काळे, कोपरगाव
‘मध्यमवर्गीय, ग्रामीण ग्राहकांना दर्जेदार, स्वदेशी व परवडणारी उत्पादने रास्त दरात मिळाली. महिला उद्योजकांसाठी हा महोत्सव आत्मनिर्भरतेकडे नेणारा मजबूत टप्पा ठरला. खरेदी प्रक्रियेतून केवळ पैशांची देवाण- घेवाणचं झाली असे नव्हे, तर विश्वास, गुणवत्ता व स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले. यामुळे गोदाकाठ महोत्सव खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक व परिणामकारक पाऊल ठरले आहे, असे कौतुकाचे बोल महोत्सवात सहभागी बचत गटाच्या महिलांनी ऐकविले.चैताली काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालक