तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणार्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले असून, त्यांना गुरुवार (दि. 19) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
दि. 5 रोजी रात्री 2च्या सुमारास निपाणी निमगाव येथील आवेश चव्हाण यांच्या घरासमोरील 25 हजारांच्या दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेले होते. याबाबत चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयास्पद चारचाकी मध्यरात्री फिरत असल्याचे दिसून आली. पोलिसांनी या चारचाकीचा माग काढला असता तो पाचेगावपर्यंत गेला. पाचेगाव परिसरातील चारचाकीबाबत पोलिसांनी माहिती काढली असता विजय मच्छिंद्र माळी, दिलीप द्वारकानाथ माळी, संतोष सुभाष माळी, सोमनाथ रावसाहेब माळी व बापू विनायक माळी यांची टोळी असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी या प्रकारची चारचाकी त्यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर नेवासा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. सोमवारी (दि. 16) रात्री पोलिसांनी छापा टाकून आरोपींना चारचाकीसह शिताफीने पकडले. त्यानंतर या आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना मंगळवारी (दि. 17) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक अहिरे, हवालदार राजू केदार, नाईक संजय माने, कॉन्स्टेबल राम वैद्य, अमोल कर्डिले, नारायण डमाळे, बाळासाहेब भवर, गीता पवार यांनी केली.