श्रीरामपूर: पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी अस्लम शब्बीर तथा बंटी जहागिरदार याची बुधवारी (ता. 31) भरदुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. येथील संतलूक हॉस्पिटलच्या समोर गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली असून, आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
एक अंत्यविधी आटोपून बंटी जहागिरदार मित्राच्या दुचाकीवर बसून घरी जात होता. ते संतलूक हॉस्पिटलसमोर आले, तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने बंटीला आधी पाठीमागून दगड मारला. त्यामुळे बंटी दुचाकीवरून उतरला आणि दगड मारणारावर दगड फेकला. त्याच वेळी हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून सहा गोळ्या बंटीवर झाडल्या आणि मोटारसायकलवरून पसार झाले. घटना घडल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. बंटी जहागिरदारला तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यास अहिल्यानगरला हलविण्यात आले. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, बंटी जहागिरदारच्या मृत्यूची बातमी समजताच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जमावाने केली. अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक नितीन देशमुख यांनी जमावाला शांत केले. सीसीटीव्ही तपासणी सुरू असून, आरोपी निष्पन्न होताच त्यांना अटक करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. नंतर जमावाने ‘श्रीरामपूर बंद’चे आवाहन केले. त्यामुळे शहरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आला आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासाला गती देण्यात आली आहे. काही व्हिडीओ फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यात आरोपी दिसत आहेत. त्यांना अटक केल्याशिवाय पोलिस स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत शांतता राखावी, असे आवाहन उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
बंटी जहागिरदारवर गुरुवारी (दि. 1 जानेवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यांच्या मागे चुलते, एक भाऊ, बहिणी, सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नुकतेच पालिका निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक रईस जहागिरदार यांचा तो चुलतबंधू होत.
कोण होता बंटी जहागिरदार
बंटी जहागीरदार ऊर्फ अस्लम शब्बीर शेख पुण्यात ऑगस्ट 2012मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील एक आरोपी असून त्याला त्यात अटकही करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. तेे प्रकरण अद्याप न्यायप्रवीष्ट आहे. बंटी जहागिरदारवर जीवघेणे हल्ले, दंगल घडविणे, शिवीगाळ, मारहाण असे विविध 19 गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातही त्याच्यावर एकूण 14 गुन्हे दाखल होते. त्यातील 11 गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झाली होती, तर तीन गुन्हे न्यायप्रवीष्ट आणि एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
श्रीरामपूर शहरात आज दुपारी बंटी जहागीरदार व त्याचा साथीदार मोपेड दुचाकीवर जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पिस्तुलातून जहागीरदार याच्यावर गोळीबार केला. नगर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर