नगर: साईबाबा संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यास मोठा हातभार लागणार असून, मंदिरासमोरील मार्ग भाविकांसाठी अधिक सोयीचा ठरेल, अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
साईबाबा संस्थानतर्फे मध्यवर्ती भागात सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेचा औपचारिक उदघाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, विजय जगताप, रवींद्र गोंदकर, बाबासाहेब कोते आदींसह नागरिक उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
भाविकांसाठी सुरू केलेल्या या पार्किंग सुविधेचे स्वागत करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, या सुविधेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. शिर्डीत येणार्या भाविकांची संख्या विचारात घेतली तर शहरात पार्किंगसाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व वाहने व प्रवासी बस रस्त्यावर उभी राहात असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
आगामी काळात खासगी प्रवासी बससुद्धा या ठिकाणाहून सोडाव्यात, अशी सूचना त्यांनी केली. नव्या पार्किंग ठिकाणाहून संस्थानतर्फे भाविकांसाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरीदेखील या ठिकाणी स्वच्छतागृह, विजेची सुविधा व पक्के बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याची सोय निर्माण करण्यात यावी. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी छोट्या इलेक्ट्रिक बस संस्थानने घ्याव्यात, अशी सूचना देखील मंत्री विखे पाटील यांनी केली.
भविष्यात ‘नो पार्किंग झोन’
मोफत पार्किंग सुविधेमुळे मंदिर परिसर भविष्यात ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करता येईल. याचा थेट फायदा वाहतूक नियंत्रणासाठी होईलच. शिवाय शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळात शिर्डी शहराच्या सौंदर्यीकरणाचे व्यापक काम हाती घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.