Shirdi free parking for devotees
नगर: शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराभोवताली होणार्या वाहनांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी संस्थानने चार एकर जागेवर मोफत पार्किंग सुरू केले आहे. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या जागेत मल्टीलेव्हल पार्किंगचे नियोजन करण्यात येत आहे. या पार्किंगमुळे भविष्यात मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक नियंत्रित ठेवण्यास हातभार लागणार आहे. शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल या मध्यवर्ती भागात चार एकर जागेवर मोफत पार्किंग सुरू करण्यात आले आहे. (Latest Ahilyanagar News)
हे पार्किंग मंदिरापासून 700 मीटर अंतरावर असून तेथून भाविकांना मंदिरापर्यंत येण्याकरिता संस्थानकडून बसेसची सोय केली जाणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पार्किंगचा शुभारंभ करण्यात आला. पार्किंग सुविधेमुळे भाविकांना मोफत वाहने लावता येणार आहेत.
मोफत सुविधेमुळे भाविकांची लूट थांबणार
भाविकांची संख्या पाहता शहरात कुठेही पार्किंगची सुविधा नव्हती. त्यामुळे चारचाकी व प्रवासी बसेस उभ्या राहात असल्याने वाहतूक कोंडी होत होती. खासगी पार्किंगमध्ये अधिकचे पैसे घेत भाविकांची आर्थिक लूट सुरू होती.
या सुविधेमुळे त्याला आता आळा बसणार आहे. आता ही वाहने पार्किंगमध्ये जाणार असून भविष्यात खासगी बसेसही पार्किंगच्या जागेत जाणार आहेत. पार्किंगपासून भाविकांना मंदिरापर्यंत येण्याकरीता संस्थान मोफत बससेवा सुरू करण्याच्या विचाराधीन आहे. तसेच विजेची सुविधा, स्वच्छतागृह, पक्के बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा केल्या जात आहेत.
पार्किंगची ठळक वैशिष्ट्ये
मोफत पार्किंग सुविधा: 4 एकर जागेत
भविष्यात मल्टीलेव्हल पार्किंगचे नियोजन
पार्किंगहून मंदिरापर्यंत मोफत बससेवा सुरू होणार
भाविकांसाठी स्वच्छतागृहे, वीज, तात्पुरत्या सोयी उपलब्ध
मंदिर परिसराला भविष्यात ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करणार
प्राथमिक स्वरूपात मोकळ्या जागेत हे पार्किंग सुरू झाले. भविष्यात तेथे मल्टीलेव्हल पार्किंग होणार आहे. त्यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्त केली जाईल. भाविकांना तिथे सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मंदिर परिसर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करता येणे शक्य आहे.- गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी
या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी सुटण्यासोबतच शिर्डीतील स्थानिकांनाही दिलासा मिळणार आहे. आगामी काळात शिर्डी सौंदर्यीकरणाचे व्यापक काम हाती घेतले जाणार आहे. संस्थानने मोफत पार्किंगपासून ते मंदिरापर्यंत भाविकांसाठी मोफत बससेवा सुरू करावी.- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा तथा पालकमंत्री, अहिल्यानगर