sai mandir shirdi pudhari
अहिल्यानगर

Shirdi : साईभक्तांना 12 टन साखरेची बुंदी पाकिटे मोफत

शिर्डी महोत्सवात रविवारपासून मिळणार सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा महाप्रसादही

पुढारी वृत्तसेवा

नाताळ सुटी आणि नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून 29 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 अखेर असे चार दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा महाप्रसादच जणू साईभक्तांच्या पुढ्यात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या काळात साईभक्तांकरिता सुमारे 120 क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकिटे व सुमारे 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे तयार करण्यात आल्याचे संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.

कोळेकर म्हणाले, की शिर्डी महोत्सवासाठी संस्थानकडे वेगवेगळ्या ठिकाणांहून येणार्‍या 89 पालख्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साईधर्मशाळा व भक्तनिवासस्थान (500 खोल्या) येथे 34500 चौरस फुटांचे मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहेत. शिर्डी महोत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक, पोलिस कर्मचारी, एक शीघ्र कृतीदल पथक, एक बॉम्बशोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पुरुष व महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त संस्थानचे पोलिस निरीक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकूण हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत असतील, अशी माहिती कोळेकर यांनी दिली.

लाडू प्रसाद विक्री आणि प्रथमोपचाराची सोय

साईभक्तांकरिता सुमारे 120 क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकिटे व सुमारे 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे तयार करण्यात आले आहेत. भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावेत यासाठी नवीन दर्शन रांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, द्वारकामाईसमोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, गेट नंबर 04 ची आतील बाजू, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेे आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे कोळेकर यांनी सांगितले. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (500 खोल्या), द्वारावती भक्तनिवासस्थान तसेच साईउद्यान इमारत परिसर, नवीन दर्शन रांग इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी मंदिर परिसरात, नवीन भक्तनिवासस्थान, धर्मशाळा व श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे.

मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुले

मंगळवार दि. 31 डिसेंबर 2024 या दिवशी श्री साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या रात्री 10 वाजता होणारी शेजारती व 1 जानेवारी रोजी पहाटे सव्वापाच वाजता होणारी काकड आरती होणार नाही, असे बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.

शिर्डी महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा

  • 29 डिसेंबर ः दु. 1 रोहन गावडे, छ.संभाजीनगर - संतवाणी

दु 3.30 स्वरश्री प्रतिष्ठान, मुंबई - आनंदयात्री

सायं. 7 पारस जैन, शिर्डी - साईभजन संध्या

  • 30 डिसेंबर ः दु. 1 स्वरा म्युझीक अकॅडमी, छ.संभाजीनगर - स्वर संगीत

दु. 3.30 प्रवीण महामुनी, शिर्डी - साईभजन संध्या

सायं. 7 लक्ष चावला, हरियाना - साईभजन संध्या

  • 31 डिसेंबर ः स.10 इंडियन आयडॉल फेम सुरभि कुलकर्णी, कोपरगाव - गीत सुरभि

दु. 1 - विजय घाटे, मुंबई - तालचक्र

दु. 3.30 - साई स्वरांजली म्युझिकल ग्रुप, नागपूर - साईभजन

सायं. 7 - नाना वीर, शिर्डी - साईभजन संध्या

रा. 9.30 - जगदीश पाटील, ठाणे - साईभजन संध्या

  • 1 जानेवारी ः स.10 - आर. डी. म्युझीक अकॅडमी, श्रीरामपूर - साईभजन

दु. 1 - कुळमेथे महाराज, नाशिक रोड - संगीतमय साईकथा

दु. 3.30 - विजय गुजर, जोगेश्वरी - साईभजन संध्या

सायं. 7 - नूर-ए-साई ट्रस्ट, लखनौ - साईभजन संध्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT