शिर्डी : शिर्डी लगतच्या निमगाव कोराळे येथील पाच गावांतील कामधेनू असलेल्या ‘श्रद्धा सबुरी’ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी असे एकूण 28 नागरिकांच्या विरोधात 41 कोटी 97 लाख 17 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सनदी लेखापाल दत्तात्रय खेमनर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी राजेंद्र गाडेकर व बाळासाहेब गाडेकर या दोघा संचालकांना अटक करण्यात आली असून, कोपरगाव न्यायालयाने त्यांना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिर्डी पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी संचालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात खेमनार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2007 ते 2004 या कालावधीमध्ये संस्थेचे पदाधिकारी संचालक व व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांनी बँकेतील रक्कमा धनादेशाने काढलेल्या आहेत. त्या संस्थेच्या किर्दीस घेतलेल्या नाहीत. बँकेत प्रत्यक्ष भरणा नसताना तो किर्दीस वारणा खर्चाने नावे टाकून अपहार केला आहे. मुदत ठेव कर्ज घेतले नसताना मुदत ठेव तारण कर्ज नावे टाकणे, मुदत ठेव कमी असताना ज्यादा कर्ज नावे टाकणे, संचालक मंडळ सभेमध्ये मुदत ठेव तारण कर्जास मंजुरी न घेणे, मुदत ठेव तारण कर्ज रजिस्टर न ठेवणे, ठेवीदारास वेळच्यावेळी मुदत ठेव पावत्या न देता त्याचा गैरवापर करणे, कर्जदार व्याज सुट पात्र नसताना कर्जदारास व्याजदरात सवलत देणे, मार्च अखेर जमा असलेली रक्कम प्रत्यक्ष संस्थेत शिल्लक नसताना ती किर्दीस जमा असलेली दर्शवून अपहार करणे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये ऑफलाइन पद्धतीने काम करणे, व्हाउचर वेळच्यावेळी तयार न करणे, मुदत ठेव पावत्या कर्जाच्या खात्यावर वर्ग न करणे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अपडेट न करणे, दिलेली कर्ज थकबाकी यादी एनपीए कर्ज कारण कर्ज याची सॉफ्टवेअरमध्ये अद्यावत नोंद न करणे, चुकीची थकबाकी व चुकीचा नफा दाखवणे असे वेगवेगळे प्रकारचे आक्षेपार्ह व्यवहार या पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात दिसून आले.
खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शिर्डी पोलिस ठाण्यात राजेंद्र सिताराम गाडेकर, बाळासाहेब कारभारी गाडेकर, ज्योती सोमनाथ गाडेकर, रंजना गंगाधर गाडेकर, भाऊसाहेब साहेबराव जगताप, भाऊसाहेब भीमराज चव्हाण, विजय शांतीलाल चोपडा, रावसाहेब कारभारी कातोरे, सागर कैलास गोसावी, कै.सिताराम जयराम गाडेकर, बाळासाहेब जयराम गाडेकर, साईनाथ रावजी गाडेकर, निवृत्ती गंगाधर कातोरे, विश्वनाथ मुरलीधर गाडेकर, सोमनाथ दत्तात्रेय गाडेकर, बाळासाहेब संपतराव बारसे, अशोकराव गोरक्षनाथ सरोदे, मथुराबाई बाळासाहेब गाडेकर, भीमराज खंडू चव्हाण, विजय शांतीलाल चोपडा, अनिल तान्हाजी खैरे, दीपक रांधवने, नितीन महाजन, शरद नामदेव भोंगळे, अशोक मोतीराम उदावंत, गणेश रंगनाथ खालकर, प्रमोद सोपान रांधवने, अविनाथ साहेबराव शिंदे या 28 पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक मॅनेजर, कर्मचारी यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हाचा तपास पोलिस निरीक्षक रणजित गलांडे हे करीत आहे.
श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत पंचक्रोशीतील अनेकांनी रेल्वेत जमीनी गेल्याने मिळालेली भरपाई, समृध्दी महामार्गातून मिळालेला मोबदला, जमीन विक्री, गुंठेवारी, शेतजमीन उत्पन्न, हातावर पोट भरून वाचवलेले पै पै, वयोवृद्धांची पेन्शन अशाप्रकारे अनेकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.