नेवासा: तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील बनावट अॅपच्या माध्यमातून केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून यात सामील असणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. या प्रकरणी सोमवारी (दि. 9) शिंगणापूर येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे संभाजी माळवदे व पदाधिकार्यांनी दिला आहे.
अधिक माहिती अशी, शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूरमध्ये काही कर्मचार्यांनी देवस्थानच्या अधिकृत अॅपऐवजी बनावट अॅप तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या अॅपचे दोन लाखांवर सदस्य असून, त्यांची सदस्यत्व फी प्रतिव्यक्ती अठराशे लावली आहे. (Latest Ahilyanagar News)
तसेच इतर पूजेच्या साहित्याची वेगळीच फी लावण्यात आली आहे. अशा प्रकारे जवळजवळ पन्नास कोटी रुपये शनिभक्तांकडून या बनावट अॅपच्या माध्यमातून जमा करण्यात आली. परंतु हा निधी देवस्थान तिजोरीत जमा न होता तो बनावट अॅपच्या माध्यमातून खासगी कर्मचार्यांच्या खात्यावर जमा झाला. अॅपच्या माध्यमातून करोडोचा निधी कर्मचार्यांनी हडप केला. यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झाली. देवस्थानची करोडोची फसवणूक करण्यात आली.
याबाबत देवस्थान प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासन यावर बोलायला तयार नाही. याबाबत प्रशासनाला लेखी खुलासाही मागितला आहे. तसेच शिंगणापूर येथे येत्या सोमवारी (दि. 9) बेमुदत उपोषण, धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
काँग्रेसचे संभाजी माळवदे, शहराध्यक्ष अंजूम पटेल, बसपाचे हरीश चक्रनारायण, छावा संघटनेचे रावसाहेब काळे यांनी मंगळवारी (दि. 3) देवस्थानचे कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेत या घोटाळ्याची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
जोपर्यंत या बनावट अॅप तयार करणार्यांचा छडा लागत नाही, दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, तसेच अपहार केलेला पैसा परत देवस्थान तिजोरीत जमा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. याविरोधात आणखी तीव्र लढा उभारणार.- संभाजी माळवदे, कामगार राज्य विभागप्रमुख, काँग्रेस